Pimpri : लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबावर कठोर कारवाई करा

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची छावा मराठा संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी उतारे व नग्नपूजा असे अघोरी उपाय सुचवत पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केलेल्या भोंदूबाबावर कडक कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. तसेच जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी छावा मराठा संघटना व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की पिंपरीत घडलेली घटना दुर्दैवी असून, इतरही अनेक कुटुंबांचं याचप्रकारे या भोंदूबाबाने शोषण केले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तपासात हे निष्पन्न होईलच, पण सुशिक्षित म्हणवणारे नागरिक अशा भोंदूबाबाच्या आहारी जातात, हे पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी आहे. यापूर्वी असे प्रकार उघडकीस आले आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहर परिसरात अशा घटना या पूर्वीही उघडकीस आल्या आहेत. मात्र, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

संबंधित भोंदूबाबावर वेळीच कठोर कारवाई झाली, तर जादूटोण्याच्या माध्यमातून होणारे लैंगिक अत्याचार टाळता येऊ शकतात. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.