Pimpri: उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतला शहरातील प्रश्नांचा आढावा

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याचा पदभार हाती घेताच कामकाजाला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात त्यांनी आज (सोमवारी) मुंबईत मंत्रालयात बैठक घेतली. शहरातील प्रश्नांचा आढावा घेतला. दरम्यान, पुढील आठवड्यात अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरात येणार असून सर्वा प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.

मुंबईत झालेल्या बैठकीला महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, डब्बू आसवाणी, नगरसेवक जावेद शेख उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा आली आहे. पवार यांनी आज सकाळी मंत्रालयात अर्थ खात्याचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न, दैनंदिन समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची माहिती तयार करण्यात यावी. त्याबाबतचा ठराव करुन राज्य सरकारला पाठवा. त्यानंतर पुढील कारवाई मी करुन घेतो अशा सूचना त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिल्या आहेत.

पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. शहरातील सर्व प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेणार आहेत, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.