Pimpri: क्रीडा समितीच्या कामासाठी स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ स्थापन करा

उपमहापौर तुषार हिंगे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेतर्फे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानच्या धर्तीवर स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा. त्या विभागामार्फतच संपूर्ण शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक संबधीची विकासकामे विकसित करण्यात यावीत, अशी मागणी उपमहापौर, क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात हिंगे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने शहर परिसरात नव्याने क्रीडा सुविधा विकसित करणेत येत असतात. या सुविधा क्षेत्रिय कार्यालय निहाय विकसित करण्यात येतात. तथापि, या सुविधा विकसित करताना क्रीडा विभागाचा अथवा क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा अभिप्राय घेतला जात नाही.

क्रीडा विभागाशी संबधीत तातडीची, आवश्यक स्थापत्य विषयक आणि इतर कामे अपेक्षित अशी होत नाहीत. त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. परिणामी त्या विकास कामावर केलेला खर्चही व्यर्थ होत असल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. महापालिका शहरात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागा संबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानच्या धर्तीवर स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा. त्या विभागामार्फत संपूर्ण शहरातील क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक संबधी संपूर्ण विकासकामे विकसित करावीत अशी मागणी हिंगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.