Pimpri: विकासकांना पाच टक्के ‘स्लम टीडीआर’ वापरणे बंधनकारक; आयुक्तांचा निर्णय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकांना पाच टक्के विकास हक्क हस्तांतरण (‘स्लम टीडीआर’) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हा निर्णय घेतला असून त्यानंतर ‘स्लम टीडीआर’ उपल्बधतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘स्लम टीडीआर’ वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्लम टीडीआर’ला भाव आला आहे. दरम्यान, यासाठी पुणे महापालिकेचा आधार दिला आहे. पुणे महापालिकेमध्ये 20 टक्के ‘स्लम टीडीआर’ क्षेत्र दिले जाते. स्लम टीडीआर नसेल तर इतर 80 टक्के टीडीआर अनुज्ञेय केला जात नाही.

महापालिकेच्या नियोजन नियंत्रण क्षेत्रामध्ये बांधकाम परवानगी प्रकरणी हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापराबाबत नियमावली आहे. यामध्ये अनुज्ञेय ( वापरण्या योग्य) टीडीआर पैकी किमान 20 टक्के टीडीआर हा ‘स्लम टीडीआर’ असावा, अशी तरतूद आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यापासून निर्माण झालेला ‘स्लम टीडीआर’ वापरण्याची तरतूद केली आहे.

सध्या बांधकाम परवानगी घेताना विकासक ‘स्लम टीडीआर’ उपलब्ध नसल्याने अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र वापरताना जागेवरील प्राप्त परिस्थितीनुसार उपलब्ध होणारी सामासिक अंतरे आणि इमारतीच्या उंचीच्या प्रमाणात अनुज्ञेय होणा-या टीडीआरसहित ‘स्लम टीडीआर’चे 20 टक्के क्षेत्र सोडून जास्तीत-जास्त बांधकाम क्षेत्र नियोजित करुन बांधकाम परवानगीसाठी प्रस्तावर सादर करतात.

या प्रस्तावांमध्ये काही वेळेस भविष्यात ‘स्लम टीडीआर’ वापरण्याच्या दृष्टीने सामासिक अंतरे व इमारतीची उंची यामध्ये योग्य ती तजविज करण्यात आलेली असते. परंतु, काही प्रकरणामध्ये भविष्यात ‘स्लम टीडीआर’ वापरण्याच्या दृष्टीने सामासिक अंतरे व इमारतीची उंची यामध्ये आवश्यक ती तजवीज केलेली नसते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये स्लम टीडीआर वापरणे शक्य होणार नाही.

मूळ एफएसआयवरील अतिरिक्त बांधकाम टीडीआरचा वापर करुन अनुज्ञेय करतेवेळी सद्यस्थितीत उपलब्ध स्लम टीडीआरचा विचार करुन वापरात येणा-या टीडीआरपैकी किमान पाच टक्के स्लम टीडीआरचा वापर असणे बंधनकारक आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सन 2019 मध्ये टीडीआर अंतर्गत 374038.92 चौरस मीटर क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातील 579480.55 चौरस मीटर टीडीआर क्षेत्र बांधकाम परवानगी प्रकरणी खर्ची टाकण्यात आले आहे. खर्ची पडणारे आणि उपलब्ध असलेले 7500.00 चौरस मीटर ‘स्लम टीडीआर’चे क्षेत्र विचारात घेत सर्वसाधारपणे किमान पाच टक्के ‘स्लम टीडीआर’ वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

दरम्यान, त्यासाठी पुणे महापालिकेतील निर्णयाचा आधार घेतला आहे. पुणे महापालिकेमध्ये टीडीआर नुसार अतिरिक्त बांधकाम अनुज्ञेय करताना 20 टक्के टीडीआर क्षेत्र हे ‘स्लम टीडीआर’ आणि 80 टक्के क्षेत्र इतर टीडीआर असा एकत्रित प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. जर, स्लम टीडीआर नसेल तर इतर टीडीआर अनुज्ञेय करण्यात येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.