Pimpri : समाविष्ट गावांमध्ये विकासकामांची रेलचेल; आमदार लांडगे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या

महेश लांडगे यांनाच पुन्हा निवडून देण्याचा नागरिकांचा निर्धार

एमपीसी न्यूज – चिखली, तळवडे, मोशी, डुडुळगाव आणि दिघी या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. पण, तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांनी नागरिकांना आमिषे दाखवली. गावांचा समावेश झाल्यानंतर मात्र, नेते मंडळींनी सोयीस्कररीत्या नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली. पण, आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांकडे लक्ष देऊन त्यामध्ये ऐतिहासिक विकासकामांची रेलचेल केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा प्रतिक्रिया जाधववाडी, मोशी आणि चिखली परिसरातील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या.

मोशी गावचे पहिले नगरसेवक बबनराव बोराटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये चिखली, तळवडे, मोशी, डुडुळगाव आणि दिघी या गावांचा समावेश करण्यात आला. मात्र, तत्कालीन सत्ताधार्‍यांनी समाविष्ट गावांतील विकासाकडे दुर्लक्ष केले. या भागातील नागरिकांकडून केवळ कर वसूल करण्याचे काम होत होते. कोणत्याही आरक्षणांचा विकास केला नाही. कसलाही प्रकल्प उभारला नाही. परिणामी, या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत होते.

महापालिकेत या गावांचा समावेश करण्यासाठी स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध होता. त्यात शरद पवार यांनी सर्व नागरिकांना हा भाग महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या मुद्द्यावर शरद पवार यांची चिखली येथे एक भव्य सभा झाली. महापालिकेत समावेश होणार नसल्याने सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ढोल आणि लेझीमच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली. पण काहीच दिवसात तत्कालीन पुढा-यांनी कुटील डाव करून सर्व गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश केला, असेही बोराटे सांगतात.

बोराटे पुढे बोलतात, मोशीसाठी आलेला निधी काही लोकांनी चतुराईने दुस-या भागात वळवला. त्यामुळे सुरुवातीची अनेक वर्ष समाविष्ट गावातील नागरिकांना विकासकामांपासून वंचित राहावे लागले. आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन 2014 नंतर या भागातील अनेक आरक्षणे ताब्यात घेतली. काहींचा विकासही केला. आमदार लांडगे यांनी धडपडीने कामं केली. त्यामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.

चिखली येथील ज्येष्ठ नागरिक पंडित बाबुराव मोरे म्हणतात, “1997 पासून म्हणावा तेवढा विकास झाला नाही. मूलभूत गोष्टींसाठी सुद्धा या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. आमदार महेश लांडगे यांनी मूलभूत गोष्टींपासून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा वसा जपत त्यांनी संतपीठाची मुहूर्तमेढ रोवली आहे. चिखली गावाची कमान बांधल्यामुळे गावक-यांची शान वाढली आहे. आमदार लांडगे यांनी केलेल्या कामाची यादी मोठी आहे. पण, काही प्रश्न अजूनही पूर्णतः सुटले नाहीत. त्या प्रश्नांचा पाठपुरावा लांडगे सातत्याने करीत आहेत. पुढील काळात ते देखील प्रश्न सुटण्याचा विश्वास आहे.”

जाधववाडी येथील नागरिक भरत बाबूराव जाधव म्हणाले, मागील दोन ते तीन वर्षांमध्ये जाधववाडी, चिखली, मोशी परिसरात रस्ते, गार्डन, गटारी, पाईप लाईन आणि अन्य अनेक प्रश्न सोडविण्यात आमदार महेश लांडगे यांना यश आले आहे. केवळ निवडणुकीपुरता कामाचा आव आणून नंतर विसरून जाण्यातला हा माणूस नाही. तर, परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारा माणूस आहे. अनेक आरक्षणाचा विकास झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.