Pimpri : भक्ती करण्यासाठी सगुण रुपातील देवता आवश्यक – इंद्रजीत देशमुख

एमपीसी न्यूज – अध्यात्मात मोक्षप्राप्तीसाठी विविध मार्ग सांगितले आहेत. पण, भक्तीचा सहज सोपा मार्ग संसारी माणसासाठी उत्तम आहे. भक्ती करण्यासाठी सगुण रुपातील देवता आवश्यक असते म्हणून मंदिर आणि मूर्ती यांना महत्व आहे, असे मत कराड येथील शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी नवी सांगवी येथे व्यक्त केले.

नवी सांगवी येथे श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा आणि वास्तुशांतीनिमित्त ते बोलत होते. दि. 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने महालक्ष्मी महात्म्य या विषयावर ते बोलत होते. यावेळी शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगुले, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण टक्केकर, सूर्यकांत गोफणे, अनिल परदेशी यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी ते म्हणाले, भारतीय संस्कृतीत नारीला पूज्य मानले जाते. आईचे स्थान वरचे आहे. आईमध्येच जे गुण असतात ते गुण वेगवेगळ्या देवींचे निर्देशक आहेत. भक्तीमध्ये त्याग आणि समर्पन असते. विकारावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. उत्क्रांतीबाबत मानवाला निसर्गातील अनेक गोष्टींचे भय वाटत होते. त्या भीतीतून दिलासा मिळण्यासाठी त्या निसर्गशक्तीची स्तुती माणूस करु लागला. त्यातूनच देव संकल्पनेचा विकास झाला. पण सुरुवातीच्या काळात मंदिरे नव्हती. कारण घराघरांतील वातावरणच मंदिंरासारखे होते. पण घरातील शांती नाहीशी झाल्यावर मंदिरांना अधिक महत्व आले.

पाहुण्यांचे स्वागत सखाराम रेडेकर यांनी केले. परिचय अशोक दुर्गुळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. राजेंद्र राजापुरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.