Pimpri:….हा तर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बालिशपणा – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज – राजकारणात मोठे व्हायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करायची असे काहीजणांनी सुरु केले आहे. त्यांच्याविरोधात बोलल्याशिवाय कोणीही मोठ होत नाही. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत असून हा त्यांचा बालिशपणा असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या वतीने सोमवारी (दि. 22)विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शेखर ओव्हाळ, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे उपस्थित होते.

“भाजपला पाच वर्षानंतरही अनेक मतदारसंघात सक्षम उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळेच आमचे आमदार संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांच्याकडून केला जातो. आपल्याला उमेदवार मिळत नाहीत, हे भाजपने कबूल करावे”असेही मुंडे म्हणाले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजितदादा जो उमेदवार तेथील त्यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.