Pimpri: ‘धन्वंतरी’ऐवजी आता आरोग्य वीमा?

महापालिका कर्मचा-यांसाठी आरोग्य वीमा लागू करण्याचे विचाराधीन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच सेवानिवृत्तांना देखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून त्याऐवजी वैयक्‍तिक वीमा योजना लागू करण्याची चाचपणी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्याकरिता वीमा योजना कंपन्यांचे प्रस्ताव पडताळून पाहिले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्मचा-यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बीले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या योजनेअंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोणात बदल करण्यात आला. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचा-यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही दिवसांपुर्वीच या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेण्यात आले आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली आहे. ही संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे.

या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचा-यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात आहे. तर, सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिका-यांच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जाते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचा-यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचा-यांवर सोपविण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हाभरातील सुमारे 100 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या धन्वंतरी स्वास्थ योजना समितीच्या सभेत कर्मा-यांची बीले मंजुर अथवा नाकारण्यासाठी विषय येत असतात. त्यामध्ये वैद्यकीय उपचाराकरिता रुग्ण दाखल झाल्यानंतर पुढील 48 तासांत तशी माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या सुमारे 70 टक्के कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र लाभार्थींची नावे असलेली यादी अद्यापही वैद्यकीय विभागाला उपलब्ध झालेली नाही. तोच आता आरोग्य धोरणात बदल करण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा कर्मचा-यांसाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिका-यांशी प्राथमिक बैठक झाली आहे.

धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत वर्षभरात सुमारे 24 ते 25 कोटींचा खर्च होत आहे. त्यामुळे दर महिन्याला महापालिकेला या योजनेसाठी दोन कोटींचे अर्थसहाय्य करावे लागत आहे. तीन-चार वर्षांपुर्वी महापालिका कर्मचा-याच्या पाल्यावर थेरगावमधील खासगी रुग्णालयात वर्षभर सुरू असलेल्या उपाचारांकरिता महापालिका प्रशासनाने 25 लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजली होती. त्यावरून महापालिका प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. याशिवाय दरवर्षी होणा-या कोट्यवधीचा खर्च आवाक्‍यात आणण्यासाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.