Pimpri: ‘धन्वंतरी’च चालू ठेवा, विमा योजना नको; महापालिका कर्मचा-यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच सेवानिवृत्तांना देखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात येऊ नये. त्याऐवजी सुधारीत धन्वंतरी योजना लागू करावी अशी मागणी करत प्रस्तावित विमा योजनेला कर्मचा-यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच वीमा योजनेची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली होती. महापालिका सेवेतील सुमारे साडेसात हजार कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी लाभ घेत होते. महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील या योजनेत सामावून घेतले आहे. धन्वंतरी योजनेसाठी चार वर्षांत 60 कोटी 91 लाख रुपये मोजले आहेत. या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात आहे.

तर, सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जाते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत आहे. या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हाभरातील 93 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेने धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करुन प्रत्येक कर्मचा-याला आरोग्य विमा योजना लागू करण्याचे नियोजन केले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता देखील दिली आहे. वीमा योजनेसाठी निविदा देखील मागविली आहे. तथापि, कर्मचा-यांनी वीमा योजनेला विरोध केला आहे. धन्वंतरी योजना लाभदायक आहे. या योजनेमध्ये हयात असेपर्यंत उपचार घेण्याची सोय आहे. विमा योजनेच्या निविदेमध्ये 65 वयापर्यंतच योजनेचा लाभ घेण्याची सुविधा मिळणार आहे.

त्यामुळे चालू असलेले धन्वंतरी योजना बंद करण्याऐवजी सुधारीत धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करावी. योजनेवर अधिकचा खर्च होत असेल. तर, महापालिका कर्मचा-यांची दरमहा असणारी 300 रुपयांच्या वर्गणीमध्ये वाढ करता येऊ शकते. परिणामी, महापालिकेचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. तसेच या धन्वंतरी योजनेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल होणा-या रुग्णांना खरोखर उपचारासाठी दाखल करण्याची गरज आहे की नाही. यासाठी डॉक्टरांच्या पथकाची नियुक्ती करणे समाविष्ट करता येऊ शकते. जेणेकरुन या योजनेवरील खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.

विमा योजना लागू करण्याबाबत मागविण्यात आलेली निविदा रद्द करण्यात यावी. कोणतीही नव्याने विमा योजना लागू करण्यात येऊ नये. द्यस्थितीतीलच धन्वंतरी स्वास्थ योजनेमध्ये सुधारणा करुन अखंडपणे चालू ठेवावी, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कर्मचा-यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.