Pimpri: भ्रष्टाचाराचे मनोमिलन झाले का? राष्ट्रवादीचा हल्लाबोल 

....लाज कशी वाटत नाही? मनोमिलनावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; मनोमिलन हा तर 'व्यावसायिक' करार

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदारांनी पंतप्रधान आवाज योजनेपासून विविध सार्वजनिक विकास कामातील भ्रष्टाचाराबाबत भाजपवर आरोप केले होते. आरोप घरचे नव्हते. जनतेच्या पैशातून विकासकामात झालेल्या गैरव्यहाराचे आरोप होते. तसेच भाजप आमदारांवर देखील वैयक्तिक आरोप केले होते. मग आता या भ्रष्टाचाराचे मनोमिलन झाले का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. तसेच लाज कशी वाटत नाही, असा सवाल देखील केला. आरोप खासगी, घरगुती नव्हते. जनतेच्या पैशातून झालेल्या विकासकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आरोप होते. ते तुम्ही मागेच घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.  

 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील दहा वर्षाचे हाडवैर संपून आज (सोमवारी) मनोमिलन झाले. खासदार बारणे यांनी आजपर्यंत जगताप यांच्यावर केलेले सर्व आरोप माघे घेतले. त्यावर आज सायंकाळी लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन त्यावर पलटवार केला. मोरवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवाणी, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे, विनोद कांबळे उपस्थित होते.
  • वाघेरे म्हणाले, “शिवसेना खासदारांनी भाजप आणि आमदारांवर विविध आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या आवास योजनेत देखील गैरव्यहार झाल्याचा आरोप केला होता. त्यासह भाजपच्या रावटीत महापालिकेत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. आता झालेले मनोमिलन दोषारोप, भ्रष्टाचारासह झाले आहे का? असा सवाल करत लाज कशी वाटत नाही, ही राष्ट्रवादीची टॅगलाईन या मनोमिलनासाठी समर्पक बसत आहे” असे वाघेरे म्हणाले. तसेच आमदारांनी देखील खासदारांवर आरोप केले होते. खासदारांनी मावळात कुठे विकास केले हे दुर्बिणीने शोधावे लागेल. फोटोवाला खासदार असे आरोप केले होते? त्याचे काय झाले असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी वृत्तपत्रातील कात्रणे दाखविली.

पिंपरीगावात अमर मुलचंदानी  यांच्या घरात ज्या मांडवली झाल्या आहेत. त्यांना आजपर्यंत कधीच यश आले नाही? असे सांगत प्रशांत शितोळे म्हणाले, “खासदारांनी केलेले आरोप सार्वजनिक विकास कामाबाबत होते. खासगी, घरगुती आरोप नव्हते. आवास योजना, कच-याच्या निविदेबाबत तर केंद्र सरकारला पत्र दिले होते. त्या आरोपांचे काय झाले. भ्रष्टाचाराचे मनोमिलन झाले का?” असा सवाल करत हे मनोमिलन म्हणजे ‘व्यावसायिक’ करार असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सार्वजनिक कामावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
  • आढळराव यांनी देखील वेस्ट टू एनर्जी, रस्ते विकास, भोसरीतील शीतल बागेतील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता त्यांना झालेला भ्रष्टाचार चांगला वाटत आहे का ? स्वत:च्या स्वार्थासाठी हे एकत्र आले असून शहरातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे मतदार यांच्या मनोमिलनाला भुलणार नाही, असेही शितोळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.