Pimpri: महापालिका हद्दीतील प्रवासासाठी Digital passची सुविधा; ‘येथे’ भरा फॉर्म

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी पालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या मोबाईल अप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे डिजिटल पास फक्त पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. ही सुविधा सोमवार (दि.11) पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यान सर्व प्रकारची शासकीय, खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर बंधने आलेली आहेत.

तथापि, अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी पालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल अप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. डिजिटल पास संबंधीत क्यूआर कोड एसएमएसवर पाठविला जाईल.

हे डिजिटल पास फक्त पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पालिका यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाउनच्या नियमांच्या अधीन राहून हे पास देण्यात येतील.

दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी, राज्य किंवा केंद्र शासनातील शासकीय कर्मचारी, बँक आणि एटीएम, गॅस, एलपीजी, पेट्रोल पंप, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक आणि पुरवठादार, टेलिकॉम इंटरनेट केबल, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, सुरक्षा सेवा, इतर अत्यावश्यक सेवा, इतर सूट दिलेली श्रेणी, नागरिकांना मदत करणान्या स्वयंसेवी संस्था, अन्न वितरण वाहन इत्यादी श्रेणींसाठी डिजिटल पास उपलब्ध आहेत.

प्रवासादरम्यान नागरिकांनी शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र व डिजिटल पास क्यूआर कोड दाखविणे अनिवार्य आहे. प्रवास करताना मार्गदर्शक तत्त्वे आणि आदेशांचे पालन करणे नागरिकांसाठी बंधनकारक राहील.

होम कारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनी डिजिटल पाससाठी अर्ज करू नयेत. आपल्या अर्जावरती स्वीकृती किंवा नकार देण्याचे अधिकार महापालिकेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत नागरिकांना पासबाबत स्वीकृती अथवा नकार कळवण्यात येईल. ही सुविधा महानगरपालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवर” सोमवार पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.