Pimpri: महापालिका ‘कॅन्टीन’मध्ये जेवताना एकाला खोकल्याची उबळ अन्…

कोरोना बाधित असल्याच्या धास्तीने कर्मचा-यांची उडाली धांदल

एमपीसी न्यूज – … स्थळ पिंपरी महापालिका कॅन्टीन… वेळ मंगळवार दुपारी दीड वाजताची… सर्दी खोकल्याचा त्रास असणारा नागरिक भूक लागल्याने शिवभोजन थाळी खाण्यासाठी दाखल होतो… जेवताना त्याला अचानक खोकल्याची उबळ येते… त्यातच त्याच्या हातातील भोसरीतील रुग्णालयात तपासणी करावी, अशी डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी…त्यामुळे हा कोरोना बाधीत रुग्ण असल्याचा उपस्थितांचा समज होतो आणि सगळ्यांचीच भंबेरी उडते… शेवटी या नागरिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा रुग्ण सर्दी, खोकल्याचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

पिंपरी महापालिकेच्या कॅन्टिनमध्ये काही लोक जेवण करत होते. या लोकांमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे असणारा पिंपरी, गांधीनगर येथील एक नागरिकही जेवण करत होता. या नागरिकाला एक दोन दिवसांपासून सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने महापालिकेच्या एका दवाखान्यात तपासणी केली. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्या नागरिकाला भोसरी येथील रुग्णालयात तपासणी करावी, अशी चिट्ठी दिली. मात्र, खूप भूक लागली असल्याने पाच रुपयांत शिवभोजन थाळी खाण्यासाठी हा नागरिक महापालिकेच्या कॅन्टिनमध्ये दाखल झाला.

तेथे शिवभोजन करीत असताना त्याला खोकल्याची उबळ आली. त्यामुळे नागरिकांनी त्याच्याकडे पाहिले असता त्याच्या हातातील डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी दिसली. त्यामुळे महापालिका इमारत परिसरात मोठी धांदल उडाली. हा कोरोना बाधीत रुग्ण आहे, असा अनेकांचा समज झाल्याने काही वेळ उपस्थित कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. मात्र, त्याची विचारपूस केल्यानंतर खरा प्रकार कळाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहीकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत बोलताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”या व्यक्तीला सर्दी, खोकल्याचा त्रास होता. तो दोन दिवसांपुर्वी खराळवाडीतील रुग्णालयात गेला होता. त्यावेळी डॉक्टरने त्याला भोसरीतील डॉक्टरांना भेटण्याची चिठ्ठी दिली होती. तो कॅन्टीनमध्ये जेवत असताना त्याला खोकल्याची उबळ आली. भोसरीतील रुग्णालयात जाण्याची चिठ्ठी असल्याने नागरिकांमध्ये चुकीचा समज निर्माण झाला होता. तो कोरोना रुग्ण किंवा होम क्वारंटाईन नव्हता”.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सर्वाधीक होती. मात्र, महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मागील 11 दिवसांपासून एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडला नाही. तसेच नऊ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून सावध रहायला हवे. घराबाहेर पडता कामा नये. ज्यांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत. त्यांनी घरातच स्वत:ला वेगळ ठे‌वणे गरजेचे आहे. परंतू, काही नागरिक गरज नसताना घराबाहेर पडत आहे. या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.