Pimpri: पवनाथडी आयोजनावरुन सत्ताधा-यांमध्ये मतभेद,जत्रा भोसरी की चिंचवडला संभ्रामवस्था कायम !

एमपीसी न्यूज – महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेला वादाची परंपरा यंदाही कायम आहे. जत्रेचे ठिकाण भोसरी असावे की चिंचवड यावरुन सत्ताधारी नगरसेवकांमध्ये मत-मतांतरे असून महिला व बालकल्याण समितीने दोन परस्परविरोधी ठराव केले. अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारी 2019 च्या दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर अचानक पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 मध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रामवस्था कायम आहे. तसेच वादाची पंरपरा देखील कायम राहिली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आज (बुधवारी) पार पडली. सभापती स्वीनल म्हेत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी पासून पवनाथडी जत्रे भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 12 वर्ष आहे. पवनाथडी जत्रा भरविण्याच्या ठिकाणीवरुन तत्कालीन सत्ताधा-यांमध्ये नेहमीच मतभेद होत होते.

फेब्रुवारी 2017 मध्ये सत्तांतर होऊन महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. गतवर्षी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होत नसल्याचे सांगत  जत्रा स्थगित करण्याची मागणी केली होती. तसेच खर्च जास्त होत असल्याचा आक्षेप देखील त्यांनी घेतला होता. त्यानंतर जत्रेचा खर्च 80 लाखावरुन 45 लाखांवर आणण्यात आला. त्यानंतर जत्रा भरविण्यात आली होती. यंदा पुन्हा पवनाथडी जत्रा भरविण्यावरुन संभ्रामवस्था निर्माण झाली आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या आज झालेल्या सभेत अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारी 2019 च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर पुन्हा  सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रामवस्था कायम आहे. तसेच जत्रेला वादाची पंरपरा देखील कायम राहिली आहे.

समितीच्या शिवसेनेच्या सदस्या मीनल यादव म्हणाल्या, ‘पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारी 2019 च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात भरविण्याबाबतचा सभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर सत्ताधा-यांनी ठिकाणामध्ये बदल केल्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही’.

सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या,’पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे भरविण्याबाबतचा ठराव करण्यात आला होता. परंतु, सर्वानुमते त्यामध्ये बदल करत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठिकाण बदल करण्याचे कारण सांगता येणार नाही’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.