Pimpri: पीएमपीएमएलच्या कारभारावर पदाधिकारी, आयुक्तांची नाराजी; नियोजनानुसार बसेसच्या फे-या होत नसल्याची आयुक्तांची तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या नियोजनानुसार बसेसच्या फे-या होत नाहीत. त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर, कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करावी. प्रशिक्षित कर्मचा-यांची भरती करावी. दररोज रस्त्यांवर बसेस बंद पडत असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्याची नाराजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. तसेच यापुढे महिन्यातील एका स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील प्रत्येक डेपो मॅनेजरच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पीएमपीएमएलमार्फत देण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी पीएमपीएमएलचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक झाली. त्यावेळी आयुक्त बोलत होते.

यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, नगररचना विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंदारे, प्रमोद ओंबासे व पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते. पदाधिका-यांनी देखील पीएमपीएमलच्या कारभारावार नाराजी व्यक्त केली.

स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी म्हणाले, रोजच्या नियोजित फे-या व प्रत्यक्षात झालेल्या फे-या याबाबतची माहिती देणारा फलक महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावा. जे ड्रायव्हर व कंडेक्टर नेहमीच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देतील त्यांच्यासाठी बक्षिस योजना राबविण्यात यावी. पीएमपीएमएलने उत्पन्नवाढीसाठी नवनवीन उपाययोजना राबवाव्यात. सर्वोत्तम सेवेची हमी नागरिकांना द्यावी.

पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे म्हणाल्या, पीएमपीएमलच्या सेवेमध्ये सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून उत्पन्न वाढीसाठी प्रायोगिक तत्वावर उपाययोजना राबविण्याबाबत येत आहेत. महापालिकेच्या ताब्यातील काही जागा पीएमपीएमएलला डेपोसाठी व पार्किंगसाठी देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.