Pimpri: आपत्ती व्यवस्थापन; महापालिका-पोलीस अधिका-यांचा व्हॉटस्‌अप ग्रुप

आपत्ती व्यवस्थापनासाठी सतर्क रहा; अधिका-यांना सूचना, आपत्ती व्यवस्थापनाबाबत महापालिकेत बैठक

एमपीसी न्यूज – पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी सज्ज रहावे. मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, कामाच्या ठिकाणचा राडारोडा हटविण्यात यावा, अशा सूचना प्रभारी आयुक्त संतोष पाटील यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच आपत्ती काळात परिस्थितीतीची माहिती व्हावी, याकरिता महापालिका आयुक्‍त, पोलीस आयुक्‍त, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व पोलीस कर्मचारी याचा समावेश असलेला व्हॉटस्‌अप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर सर्व अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहू शकणार आहेत. तसेच कोणत्या भागात परिस्थिती कशी आहे? याचेदेखील अपडेटस्‌ दिले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नदीपात्रालगतची पुराचे पाणी नागरवस्तीत शिरण्याची ठिकाणे व त्यासह अन्य उपाययोजनांबाबतचा सविस्तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, अशी सूचना अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या होत्या.

  • या पार्श्‍वभूमीवर महापालिका मुख्यालयात आज (मंगळवारी) आपत्ती व्यवस्थापनाबाबतची बैठक पार पडली. प्रभारी आयुक्‍त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला महापालिका अग्निशमन दलाचे किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

संतोष पाटील यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. सध्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, कामाच्या ठिकाणचा राडारोडा हटविण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. याशिवाय आपत्कालीन स्थितीत समन्वय साधण्यासाठी एका अधिका-यीची नोडल ऑफीसरपदी नियुक्‍ती करण्याचे देखील सुचविण्यात येणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाला महापालिका प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र दिले जाणार आहे.

  • नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महिनाअखेरपर्यंत शहरातील सर्व नाले, गटारांची स्वच्छता केली पूर्ण केली जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले. एखादी आपत्तीजनक घटना घडल्यास, त्यावर उपापययोजना करण्यासाठी या काळात आपत्ती व्यवस्थापन व महापालिका नियंत्रण कक्षाचा भारतीय लष्कर आणि एनडीआरएफशी 24 तास समन्वय ठेवला जाणार आहे. या दोन्ही दलांच्या प्रमुख अधिका-यांचे संपर्क क्रमांक अपडेट करण्यात आले आहेत.

याशिवाय प्रत्येक विभागातील अधिकारी व कमरचाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून, या काळात मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिका-यांच्या संपर्कात नियंत्रण कक्ष असणार आहे. पावसाळ्यात महापालिका प्रशासनाची कशी तयारी असनार आहे? याची सर्व माहिती संकलीत करण्यात आली आहे. याशिवाय आपत्तीकाळात संपर्क साधावयाच्या अधिका-यांची नावे व संपर्क क्रमांकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार हा आराखडा येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाला महापालिका प्रशासन सादर करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.