Pimpri: विषयांवर चर्चा करु, एकत्रित निर्णय घेऊ; विरोधाला विरोध करु नका’; महापौरांचे गटनेत्यांना आवाहन

महापौरांनी घेतली गटनेते, माजी महापौरांची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शहरात विविध विकासकामे करायची आहेत. शहराच्या हिताचे एकत्रित निर्णय घेऊ, सर्वसाधारण सभेत प्रत्येक विषयांवर सांगोपांग चर्चा केली जाईल. केवळ विरोधाला विरोध करु नका, गोंधळ घालू नका. खेळीमेळीच्या वातावरणात सभेते कामकाज करु, असे आवाहन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी गटनेत्यांना केले.

महापालिकेची डिसेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा उद्या (शुक्रवारी) होणार आहे. महापौर ढोरे यांची उद्याची पहिलीच सर्वसाधारण सभा आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या दालनात गटनेते, माजी महापौरांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. सविस्तर चर्चा केली. सभेच्या एक दिवस अगोदर गटनेते, माजी महापौरांची बैठक घेऊन महापौर ढोरे यांनी चांगला पायंडा पाडला आहे.

या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, मनसेचे सचिन चिखले, माजी महापौर राहुल जाधव, अपर्णा डोके आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच गटनेत्यांची सभेच्या अगोदर बैठक झाली आहे.

यावेळी महापौर ढोरे म्हणाले, सर्वांना शहराचा विकास करायचा आहे. शहरात चांगली विकास कामे करायची आहेत. सर्व मिळून एकत्रित कामे करु, विषयांवर चर्चा केली जाईल. सर्वसंहमतीने निर्णय घेतले जातील. एकोप्याने कामकाज करु, खेळीमेळीच्या वातावरणात महासभेचे कामकाज केले जाईल. प्रत्येकाला आपला पक्षाच्या बाजू मांडायची असते. सर्वांना संधी दिली जाईल. परंतु, विरोधाला विरोध करु नका, गोंधळ घालू नका, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

शहरात पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपण सर्वजणांनी मिळून खरी परिस्थिती काय आहे? याची जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. जागेवरुनच तक्रारी सोडविण्याचे प्रशासनाला निर्देश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

महापौर दालनातील फलक बदलला!
महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर दालनातील ज्येष्ठ नेते शरद पवार, दिवंगत नेते रामकृष्ण मोरे यांच्या ‘तसबिरी’ भाजपने काढल्या. त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला होता. तेव्हा भोसरीच्या गटातील नितीन काळजे, राहुल जाधव महापौर होते. पावणेतीन वर्षांनी महापौर बदल झाला. चिंचवडच्या माई ढोरे महापौर झाल्या. त्यांनी जुना फलक बदलत नवीन फलक लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांचे छायाचित्र असलेला फलक लावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.