Pimpri: पीएमपीएमएलच्या नेहरुनगर, निगडी, भोसरीतील बस डेपोचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पीएमपीएमएलच्या निगडी, नेहरुनगर, सद्गुरुनगर व भोसरीतील बस डेपोत येणाऱ्या बसेसचे सोडिअम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील दहा रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे म्हणजेच बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन मंडळ मर्यादित या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थेच्या बस डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या बसेसचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत निगडीतील बस डेपो, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत नेहरुनगर येथील बस डेपोचे ठिकाण, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत सद्गुरूनगर, भोसरीतील बस डेपोचे ठिकाणी येणाऱ्या बसेसचे निर्जुंतीकरण करण्यासाठी प्रत्येकी दोन कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दैनंदिन कामकाजाच्या वेळेनुसार हे कामकाज करण्यात येणार आहे. भोसरी, निगडी, नेहरुनगर येथील बस डेपोमध्ये येणाऱ्या बसेसचे नियमितपणे सोडिअम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.