Pimpri : प्रतिनियुक्तीवरील अभियंत्यावरुन महापालिकेतील सत्ताधा-यांचा राज्य सरकारशी संघर्ष

एमपीसी न्यूज – राज्यातील भाजप सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अधिका-याची नियुक्ती केली असताना महापालिकेतील भाजपच्याच सत्ताधा-यांनी महापालिकेतील अधिका-याला शहर अभियंतापदी बढती दिली आहे. बढतीची उपसूना देखील वादग्रस्त ठरली आहे. प्रतिनियुक्तीवरील अभियंत्यावरुन महापालिकेतील सत्ताधा-यांनी स्वपक्षाच्या राज्यातील सरकारशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण 30 एप्रिल 2019 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. शहर अभियंतापद रिक्त असल्याने राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवरील शहर अभियंत्याची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 7 जून रोजी महापालिकेच्या शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर अ. मा. भालकर यांची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सह सचिव सं. द. सूर्यवंशी यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

राज्य सरकारने नियुक्ती केल्याने भालकर महापालिकेत रुजू होण्याची शक्यता आहे. ते रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्वत:च्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देत घाईत गुरुवारी (दि. 20) झालेल्या महासभेत सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची विसंगत उपसूचना मंजूर केली.

सत्ताधा-यांनी चक्क स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधण्याच्या अवलोकन प्रस्तावास शहर अभियंता बढतीची विसंगत उपसूचना देत मंजूर केली. विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांकडे देखील दुर्लक्ष केले. सत्ताधा-यांनी स्वत:च्या राज्यातील सरकारशी संघर्ष करण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. प्रतिनियुक्तीवरील शहर अभियंता अ. मा. भालकर यांना रुजू करून घेतले जाणार आहे का? असे विचारले असता त्यांनी त्याबाबत देखील भाष्य करण्यास टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.