Pimpri : बालशाहीर पुरस्काराचे वितरण उत्साहात

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तुकाराम बीजेच्या दिवशी बालशाहीर पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला. शाहिरी कलेला उत्तेजन मिळावे, तसेच बालशाहिरांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी गेली २० वर्षे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने बालशाहीर पुरस्कार सोहळ्याचे संयोजन केले जाते.

यंदाच्या वर्षी चि. आर्य शेवाळे, चि. प्रथमेश थोरात, चि. सिद्धेश केसकर, चि. अथर्व कुलकर्णी आणि कु. ईशा बांदिवडेकर यांना बालशाहीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नंदू कदम, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे आणि पुरस्कर्ते उद्योजक दीनानाथ जोशी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

  • बालशाहिरांनी ऐतिहासिक, सामाजिक, पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करणारे पोवाडे सादर केले. प्रथमेशने राजर्षि शाहू महाराज, सिद्धेशने स्वा. सावरकर लिखित बाजीप्रभू देशपांडे, आर्यने तोरणा गड, ईशाने शिवचरित्र तर अथर्वने बालशाहीर पोवाडा सादर केला. त्यानंतर कोल्हापूरचे ज्येष्ठ शाहीर संजय जाधव यांनी शाहिरीचे दमदार सादरीकरण करत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.

यावेळी या बालशाहिरांच्या कुटुंबीय व मार्गदर्शकांसह ज्येष्ठ शाहीर साहेबराव जगताप, शाहिर अशोक कामथे, राजेंद्र आहेर व अनेक शाहिरप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. शाहिर प्रकाश ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री नंदू कदम यांनी आभार मानले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या वनिता मोहिते, प्रचिती भिष्णूरकर, स्मिता बांदिवडेकर, कीर्ती मराठे, लीना देशपांडे, कांचन जोशी, चित्रा कुलकर्णी यांनी संयोजन केले. संत तुकाराम प्रतिष्ठानचे हरिभाऊ करमरकर यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.