Pimpri: ‘साद सोशल फाउंडेशन’च्या वतीने 150 दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीदेखील पुढे सरसावल्या आहेत. मात्र, शहरातील दिव्यांग बांधव या मदतीविना दुर्लक्षित राहिले आहेत. समाजातील विशेष घटक म्हणून आज दिव्यांग बांधवांकडेही सर्वांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे ओळखून ‘साद सोशल फाउंडेशनने या दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला.

कोरोनामुळे दिव्यांग बांधवांच्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या साद सोशल फाउंडेशनने माणुसकीच्या नात्याने निगडी व चिंचवड परिसरातील मोहननगर परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी पीठ, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले, व आदी जीवनावश्यक साहित्याचे प्रती पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक किट तयार करून त्या कीटचे वाटप केले. त्यामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. निगडी व मोहननगर परिसरातील जवळपास 150 दिव्यांग बांधवाना या जीवनावश्यक किटचे वाटप केले.

यासाठी साद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद, कार्याध्यक्ष परेश मोरे, जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव, बाळाभाऊ मोरे, किशोर जैद, अरुण जोगदंड, राहुल कोल्हटकर, तेजस भंडारी, अहिमद शेख, विशाल कांबळे, रवि वंजारी, रामा चिंताले आदींनी परिश्रम घेतले.

 

 गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शहरातील कामगार, कष्टकरी व दिव्यांग बांधवांवर यामुळे आभाळ कोसळले आहे. पिंपरी-चिंचवडमधील साद सोशल फाउंडेशन या संपूर्ण परिस्थितीशी लढण्याकरिता आणि नागरिकांच्या मदतीकरिता सज्ज आहे. कामगार व कष्टकरी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, समाजातील विशेष घटक या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी दिव्यांग बांधवाना या वस्तूंचे किट देण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिव्यांग कुटुंबियांना ‘दिवाळी फराळ वाटप’ च्या माध्यमातून साद फाउंडेशन समाजऋण फेडण्याचे काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील अशा कामी पुढाकार घ्यावा.. इरफान सय्यद : अध्यक्ष, साद सोशल फाउंडेशन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.