Pimpri : सेवाभावी संस्थांकडून बेघरांना मायेचा घास, गरजुंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज : कोरोना विरुद्धच्या लढ्यात शासकीय यंत्रणेसह विविध सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देत आहे. कुणी अन्नदान, तर कुणी जीवनाश्यक साहित्य वाटप करून गरजू आणि बेघरांना मदतीचा हात देत आहेत. तर काहीजण जीवाची पर्वा ना करता दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरक्षा साधने पुरवीत आहेत.

पिंपरी रोटरी क्लब तर्फे मजुरांना अन्नधान्याचे वाटप

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्यावतीने सोमाटणे फाटा येथील मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पोलिसांना देखील शुद्ध पाण्याची बॉटल, मास्क दिले आहेत.

सोमाटणे फाटा येथे 20 मजुरांची कुंटुंबे राहतात. त्यांच्याकडील अन्नधान्य संपले होते. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पिंपरीतर्फे अन्नधान्याची किट बनविण्यात आले. त्यामध्ये तांदूळ, तूरडाळ, गव्हाचे पीठ, मीठ, तेल, मसालाचे पाकीट होते. हे किट मजुरांना देण्यात आल्याचे, खजिनदार आनंद सुर्यवंशी यांनी सांगितले.

रोटरीचे अध्यक्ष बाळासाहेब उ-हे म्हणाले, लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी, मजुरांचे हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने पैसे मिळत नाहीत. त्यामुळे धान्य खरेदी करता येत नाही. सोमाटणे फाटा येथील मजुरांना अन्नधान्याची किट देण्यात आली. तसेच जीवाची पर्वा न करता आपली सुरक्षा करणा-या पोलिसांना शुद्ध पाण्याची बॉटल दिल्या आहेत. रावेत, मुकाई चौक, आकुर्डी, पिंपरी ठाण्यातील पोलिसांना मास्क दिले आहेत.

१०० पोलिसांना ‘एन ९०’ मास्क वाटप

रेल्वे सल्लागार समिती सदस्य व शिवसेनेचे पिंपरी चिंचवड कार्यालयप्रमुख बशीर सुतार यांनी स्वतः पुढाकार घेत सेवाभावी संस्थांच्या मदतीने गोरगरिबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोच केले. तसेच त्यांनी निगडी पोलीस ठाण्यातील १०० पोलिसांना ‘एन ९०’ मास्क दिले. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांच्याकडे नुकतेच हे मास्क सुपूर्द केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अरिफ शेख उपस्थित होते.

रिपोस एनर्जीतर्फे गरजुंना जेवणाची व्यवस्था

कोविड-१९ मुळे सुरु असलेल्या या लॉकडाउनच्या गरजू नागरिकांच्या मदतीसाठी रिपोसचे सुमारे १०० कर्मचारी धावून आले आहेत. पुणे स्थित डोअर टू डोअर डीझेल डिलिव्हरी करणाऱ्या रिपोस या स्टार्टअपने ‘Lend A Hand’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या आठवड्यात या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी आपला एक महीन्याचा पगार गरीबांच्या मदतीसाठी दिला होता. प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वत:च्या मनाने ही मदत केली, यासाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. यामुळे साधारण ७ लाख रुपये गोळा करण्यात आले, ज्याचा लाभ १५०० परिवारांना झाला, अशी माहिती रिपोसच्या सह संचालिका अदिती भोसले वाळुंज यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या, आम्ही आमच्या सहभागीदार (पार्टनर्स) आणि विक्रेत्यांना देखील ही कल्पना सांगितली. आम्ही त्यांना केवळ ५०० रुपये या उपक्रमात देण्याचे सुचविले, ज्या माध्यमातून परराज्यातील मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. या कल्पनेला त्यांनी देखील दुजोरा दिला. आम्ही आता २५०० परिवारांची मदत करता येईल इतके पैसे गोळा केले आहेत.” असेही त्या म्हणाल्या.

तर या कल्पनेमुळे २५०० परिवारांसाठी पुढील २१ दिवसांसाठी तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अर्थात ३.७५ लाख जेवणांची व्यवस्था. एक उदाहरण तर असे देखील आहे जिथे एका महिलेने २५ हजार रुपये या उपक्रमात दिले तसेच त्यांच्या बिल्डिंग मधील ५० परिवारांना देखील या उपक्रमात सहभागी केले. शिवाजी नगर, येरवडा, पिंपरी, धायरी, बोपखेल, मोशी आणि चाकण या भागातील अशा गरजू परिवरांना आम्ही मदत करत आहोत, अशी माहिती रिपोसचे सहसंचालक चेतन वाळुंज यांनी दिली.

निराधारांना कन्नड संघाचा मदतीचा हात

पिंपरी चिंचवड संघांच्यातीने भोसरी आणि लांडेवाडी परिसरात बेघर, निराधार तसेच स्थलांतरित मजुरांना दररोज अन्नदान करण्यात येत आहे. भोसरी उड्डाणपूल तसेच लांडेवाडी येथे या अन्नदानाचे वाटप केले जाते. त्यासाठी सोशल डिस्टंसिन्गचे पालन केले जाते. दररोज साधारण तीनशे नागरिक या अन्नदानाचा लाभ घेतात. या उपक्रमाला २२ दिवस पूर्ण झाले आहे. लोकडाऊन उठेपर्यंत हे अन्नदान सुरु राहणार असल्याचे कन्नड संघाचे ध्रुव कुलकर्णी यांनी सांगितले. अन्नदानासाठी संजू रोडगी, सुधीर कलशेट्टी, गंगाधर बेन्नूर आणि राजकुमार हे मेहनत घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.