Pimpri : मराठा आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे !

आत्महत्या करू नका; आंदोलकांना समस्त वारकरी संप्रदायाचे आवाहन

153

एमपीसी न्यूज – मराठा समाजाच्या आंदोलकांनी हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही मूल्यांच्या मदतीने, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, आपला जीव लाख मोलाचा आहे. तेव्हा आत्महत्येचा विचार करू नका. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्याग्रह वा समितीमार्फत चर्चा करून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन राज्यभरातील विविध संप्रदायांच्या प्रमुख संतमंडळींनी व संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासकांनी केला आहे.

HB_POST_INPOST_R_A

सकल मराठा समाज आरक्षण व इतर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी करीत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील मान्यवर व संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या ज्येष्ठ संतमंडळींनी एका निवेदनाव्दारे हे आवाहन केले आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक विठ्ठल रूक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सदस्य ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संतश्रेष्ठ जगत्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. संभाजी महाराज मोरे, ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज तुपे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे, मराठा वारकरी संप्रदाय संस्था आळंदीचे ह.भ.प. गुरूवर्य माऊली जनार्दन जंगले महाराज, श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, श्री. क्षेत्र आळंदी देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. अशोकराव पलांडे, संत गाडगेबाबा धर्मशाळा पुणेचे मुख्य विश्वस्त व श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अशोक चंदनगुडे, रांजणगाव गणपती देवस्थानचे उपाध्यक्ष अॅड. विजय दरेकर, रांजणगाव गणपती ट्रस्ट माजी मुख्य विश्वस्त मकरंद देव, देशमुख प्रतिष्ठानचे विजयराव देशमुख, पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त तेजेंद्र कोंढरे, गोरख भिकुले, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, ह.भ.प मंगला नंदकुमार कांबळे , ह.भ.प. किर्तनकार जनार्दन सातव महाराज आदींचा समावेश आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सकल मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. लोकशाही मूल्यांची पाठराखण करीत, सत्याग्रह अथवा अन्य समितीच्या माध्यमातून चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा घटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. त्याचा आपण उपयोग करूया. लोकांच्या व समाजहितासाठी साधू-संतांचे आशीर्वाद तर आहेतच पण संयम, शांतता आणि विवेक यांच्या समन्वयाची आज नितांत आवश्यकता आहे.

आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी खाजगी-सरकारी वाहने अथवा इतर मालमत्ता यांचे नुकसान करणे म्हणजे आपण आपलेच नुकसान करण्यासारखे आहे. म्हणून असे नुकसान होणार नाही याची खबरदारी आंदोलनाच्या नेतृत्वाने व समाजधुरीणांनी घ्यावी किंवा त्यापासून आंदोलकांना रोखण्याची योजना करून अंमलबजावणीही करावी.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या “विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ”
या वैष्णव धर्माचे आपण पाईक आहोत. समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करून अफवा, समाजमन अस्थिर करणारी विधाने, दृष्ये यांचा प्रसार टाळावा. आपल्या न्याय मागण्यांच्या आंदोलनामुळे समाजात व जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: