Pimpri: राज्य सेवेतील प्रशासन अधिकाऱ्यांना पालिका सेवेत घेऊ नका- कर्मचारी महासंघाची मागणी

Do not hire state administration officers in municipal service- Demand of Employees Federation :

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारी पद पालिका सेवेतील कार्यालयीन अधिक्षक पदावरील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने अथवा सरळसेवेतून भरणे आवश्यक आहे. रिक्त पदांवर पालिका सेवेतील कर्मचाऱ्यांमधून तातडीने जागा भराव्यात, अशी मागणी करत राज्य सेवेतील प्रशासन अधिकाऱ्यांना पालिकेत रुजू करुन घेण्यास कर्मचारी महासंघाने विरोध केला आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि महासचिव सुप्रिया सुरगुडे-जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. राज्य सेवेतील पालिकेत नियुक्त केलेल्या दोन प्रशासन अधिकाऱ्यांना रुजू करुन घेण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

पालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी अभिनामाची 26 पदे मंजूर आहेत. ही पदे अधिक्षक पदावरील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने अथवा सरळसेवेतून भरणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीत प्रशासन अधिकारी या पदावर राज्य सरकारकडून काही अधिकारी पालिकेत प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात येणार असल्याचे समजते. तथापि, या अधिकाऱ्यांना पालिकेत रुजू करुन घेण्यात येऊ नये.

प्रशासन अधिकारी हे पालिका स्तरावरील पद आहे. त्या पदावर सरकारकडील अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास पालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल.

त्यामुळे रिक्त असलेल्या प्रशासन अधिकारी या पदावर पालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांमधून या जागा तातडीने भरण्यात याव्यात.

पालिका कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सरकारकडील अधिकारी प्रशासन अधिकारीपदावर रुजू करुन घेतल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल.

त्यामुळे काही अनुचित घटना घडल्यास त्या सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असा इशारा देत राज्य सरकारकडील प्रशासन अधिकारी पालिकेत सेवेत रुजू करुन घेऊ नयेत, अशी मागणी महासंघाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.