Pimpri: पावसाळी अधिवेशन कालावधीत मुख्यालय सोडू नका; विभागप्रमुखांना आयुक्तांचे निर्देश

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील संपर्कात राहण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला उपलब्ध करुन द्यावी लागते. ही माहिती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख अथवा शाखाप्रमुखांची आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी अधिवेशन काळात मुख्यालय सोडू नये, दीर्घ मुदतीच्या रजेवर न जाता सार्वजनिक सुट्टीच्यादिवशी देखील संपर्कात राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची असणार आहे.

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात उपस्थित केलेल्या तारांकीत, अतारांकीत प्रश्‍न, आश्‍वासने, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख सूचना, अर्धा तास चर्चेची सूचना, कपात सूचना तसेच औचित्याचा मुद्दा, ठराव आदी प्रश्‍नांबात तसेच केलेल्या कार्यवाहीबाबतची माहितीची मागणी राज्य सरकारकडून केली जाते. ही माहिती तातडीने राज्य सरकारला उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे. त्याकरिता संबंधित विभागप्रमुखांकडील माहिती आयुक्तांच्या मान्यतेने तातडीने स्वयंस्पष्ट अहवाल, पूरक टिपणीसह उपलब्ध करुन दिली जाते.

  • राज्य सरकारकडून मागविलेली माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली जाते. त्याकरिता मंत्र्यांची मान्यता घेऊन तारांकीत प्रश्‍नांसाठी आठ दिवस तर अतारांकीत प्रश्‍नांसाठी 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये विधिमंडळ सचिवालयाला प्रश्‍नाची उत्तरे प्राप्त न झाल्यास, ऑनलाईन प्रणाली आपोआप बंद होईल. त्यानंतर प्रश्‍नांची उत्तरे विधानमंडळ सचिवालयास देता येणे शक्‍य होणार नाही.

अशा परिस्थितीत उत्तरे द्यावयाची झाल्यास, विलंबाच्या खुलाशासह आणि जबाबदारी निश्‍चित करुन द्यावे लागणार आहेत. ही बाब आयुक्‍तांनी विभागप्रमुख, शाखाप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

  • अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विभागप्रमुख अथवा शाखाप्रमुख यांनी विधानमंडळाच्या कामकाजाच्या बाबतीत प्राप्त होणा-या प्रश्‍नांबाबत कालमर्यादेचे गांभीर्य व महत्व लक्षात घेऊन, त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विधानमंडळ अधिवेशनाच्या काळात सर्व विभागप्रमुख व शाखा प्रमुखांबरोबरच त्यांच्या विभागातील कर्मचा-यांनी देखील मुख्यालय सोडू नये. तसेच प्रदीर्घ रजेवर न जाता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यालयाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

या कामकाजात विलंब, टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा झाल्यास, त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची असणार आहे, असे आयुक्‍त हर्डीकर यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. खबरदारीचा उपाय म्हूण सर्व विभागप्रमुख , शाखाप्रमुख व कर्मचा-यांना दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.