Pimpri : ‘कोरोना’मुळे शहर सोडायची खरंच गरज आहे का ?

 प्रमोद यादव  एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही, असे कितीही सांगितले तरी नागरिकांमध्ये भिती आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई या सारख्या शहरांमधून लोक गावाकडे दाखल व्हायला लागले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय व स्पर्धा परीक्षेसाठी शहरात आलेले विद्यार्थी तसेच नागरिक कोरोनापासून बचावासाठी शहर सोडून आपापल्या गावाला जात आहेत. पण, कोरोना या आजाराला घाबरून खरंच शहर सोडून जायची गरज आहे का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर कोरोना संबंधित बातम्या तसेच माहिती प्रसारित होत आहे. कोरोना संशयित रुग्ण आणि कोरोना बाधित रुग्ण यामधील फरक लोकांना करता येत नसल्याने भीतीचे वातावरण तयार होत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्या कारणाने त्याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले आहेत. कोरोना संबंधी जास्त बाऊ केल्याने लोक शहर सोडण्याचा निर्णय घेत आहेत. गावाकडून सारखे येणारे आई वडिलांचे फोन यामुळे ‘जीव महत्वाचा आहे काम परत करता येईल’ अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या भावनेतूनच लोक शहर सोडण्याचा निर्णय घेत आहेत.

कोरोना संशयित प्रत्येक रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ असेलच असे नाही. उदाहरण दाखल सातारा येथे दोन दिवसापूर्वी सापडलेला संशयित रुग्ण तपासणी अंती ‘निगेटिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या अफवांवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार नागरिकांनी करायला हवा.

शहर सोडणे हा पर्याय आहे का ?

ज्यांना शक्य आहे त्यांनी गावाला जायला हरकत नाही. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी, कंपन्यांकडून रजा देण्यात आलेले कामगार व कर्मचारी अशांनी गावाला जायला हरकत नाही. पण प्रवासादरम्यान संसर्गाचा धोका आहे का, हे सुद्धा तपासून पहिले पाहिजे. प्रत्येक प्रवाशाची ट्रॅव्हल हिस्टरी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे योग्य मास्क, सॅनिटायझर व हात स्वच्छ ठेवणे अश्याप्रकारे सुरक्षित प्रवास करायला हरकत नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारी यंत्रणा योग्य काळजी घेत आहेत. संशयित रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत तसेच बहुतांश पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीही स्थिर आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. शहरात कोरोनाची महामारी पसरू नये, म्हणून प्रशासन शक्य त्या उपायोजना करत असून, नागरिकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहर सोडून गावाला जाणे हा पर्याय नसून आपण जिथे आहोत तिथे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मतानुसार, सध्या विलगीकरणावर जास्त भर देण्यात येत असून, नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. तसेच प्रवास करताना योग्य काळजी घ्यावी. शक्यतो जिथे आहात तिथेच राहून निर्देशित केलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करावे, असे ‘आयएमए’कडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे वैयक्तिक काळजी घेऊन आणि शक्य तेवढी गर्दीची ठिकाणे टाळून या आजारापासून बचाव करता येऊ शकतो. तोंड, नाक, डोळे यांना सारखा स्पर्श न करणे, शिंकताना तसेच खोकताना तोंडाजवळ रुमाल धरणे आणि सॅनिटिझर किंवा साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे अशा प्रकारे काळजी घेऊन कोरोनापासून बचाव करू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.