Pimpri : आता रामजन्मभूमी मंदिर उभारणीस विलंब नको -डॉ. गोविंद कुलकर्णी

एमपीसी न्यूज – अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी करावी. लागलेली वर्षानुवर्षांची प्रतीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आली आहे. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेऊन भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेले रामजन्मभूमी मंदिर लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा देशहिताचा आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणारा आहे, या शब्दांत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीचीच असल्याचे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने या वादावर पडदा टाकत असतानाच सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पर्यायी पाच एकर जागा देण्याचा आदेश देऊन सरन्यायाधीशांनी संतुलन साधले आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भूतकाळात काय झाले?, हे विसरून दोन्ही समाजबांधवांनी राष्ट्रहितासाठी यापुढे एकदिलाने वाटचाल करावी. सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्याय संस्था असून दोन्ही बाजूंनी सादर केलेले साक्षी-पुरावे तसेच केलेले युक्तिवाद याबाबत प्रदीर्घ सुनावणी करून दिलेला निकाल श्रद्धा आणि हक्क या दोन्हींचे रक्षण करणारा आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मंदिराचा आराखडा आणि मंदिर उभारणीसाठी आवश्यक तयारी आधीच झालेली आहे. त्यामुळे विनाविलंब काम सुरु करून विक्रमी वेळेत मंदिर उभारणी करणे शक्य आहे, असे महासंघाचे पत्रकात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्य घटनेचे ३७० वे कलम रद्द होण्यापाठोपाठ रामजन्मभूमीबाबतचा हा निर्णय देशाला नवी उभारी देणारा आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीबरोबरच देशात नवे रामराज्यही सुरू होईल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.