Pimpri: दुजाभाव करु नका!; महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरांचे पूर्णवेतन द्या -सचिन साठे

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातील हंगामी प्राध्यापकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, महापालिकेत कार्यरत असणा-या डॉक्टरांचे अर्धे वेतन केले आहे. हा डॉक्टरांवर अन्याय आहे. आयुक्तांनी तत्काळ डॉक्टरांसह परिचारिका, पॅरामेडीकल स्टाफ, वैद्यकीय विभाग व आरोग्य विभागातील कर्मचा-यांचे 100 टक्के वेतन अदा करावे अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

हंगामी प्राध्यापकांचे पूर्ण वेतन तर डॉक्टरांचे अर्धेवेतन या दुजाभावाची बातमी ‘एमपीसी न्यूज’ने गुरुवारी (दि.16) प्रसिद्ध केली होती. त्यानंतर साठे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून डॉक्टरांचे पूर्णवेतन अदा करण्याची मागणी केली आहे.

सचिन साठे यांनी म्हटले आहे की, कोरोना’ या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला निधी कमी पडू नये म्हणून वर्ग ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’च्या कर्मचा-यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. त्या आदेशान्वये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ कर्मचा-यांचे 50 टक्के, वर्ग ‘क’ कर्मचा-यांचे 25 टक्के वेतन कपात केले.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची आर्थिक कुवत विचारात घेऊन निर्णय घ्यावा असे म्हटले असतानाही आयुक्तांनी वैद्यकीय व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांवर एक प्रकारे अन्याय केला आहे. कोरोना या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचा-यांना पूर्ण पगार देऊन प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित आहे.

तशी आर्थिक कुवत महापालिकेची आहे. मात्र, आयुक्तांनी घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयामुळे वैद्यकीय विभागातील कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या कर्मचा-यांचे कपात केलेले वेतन त्यांना ताबडतोब द्यावे.

प्रत्यक्ष कोरोना वॉर्डमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना व घरोघर सर्वेक्षण करणा-या ‘आशा सेविका’ व त्यांच्याबरोबर काम करणा-या इतर कर्मचा-यांना प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, अशी मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.