Pimpri: रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देऊ नका; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संरक्षण विभागाच्या रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देण्यात येऊ नयेत. यापूर्वी अनधिकृतरित्या घेतलेल्या सोयी-सुविधा तत्काळ खंडीत करण्यात यावेत, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यांना रेडझोन बाधित भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्यासाठी पत्र दिले आहे. महापालिकेतर्फे रेडझोन बाधित मिळकतींची यादी प्रसिद्ध केली आहे. परिणामी, रेडझोन बाधित भूखंडाचे, खरेदी-विक्री व्यवहार काही अंशी कमी झाले आहेत. परंतु, अद्यापही काही ठिकाणी रेडझोन बाधित भूखंडाचे, मिळकतीचे खरेदी विक्री व्यवहार होत आहेत. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेकडे त्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत.

  • रेडझोन बाधित जागेत महापालिकेतर्फे कोणतीही बांधकाम परवानगी देता येणार नाही. अनधिकृत उपविभागणी केलेल्या भूखंडाचे पर्यावसन अनाधिकृत बांधकामांमध्ये होण्याची, अशी अनाधिकृत बांधकामे सर्वसामान्य नागरिकांना फसवणूक करुन विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांची संभाव्य फसवणूक टाळावी. रेडझोन हद्दीतील बांधकामांना रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, जल:निसारण, वृक्षसुशोभीकरण, आरोग्यविषयक सेवा, कचरा संकलन या सुविधा पुरविल्या जाणार नाहीत. यापूर्वी अनधिकृतरित्या घेतलेल्या सोयी-सुविधा तत्काळ खंडीत करण्यात यावेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.

….महापालिका हद्दीतील ‘हे’ आहेत रेडझोन बाधित सर्व्हे :
वडमुखवाडी – सर्व्हे क्रमांक 80 ते 120, 127, 162 ते 176.
दिघी – सर्व्हे क्रमांक 75 ते 78.
भोसरी – सर्व्हे क्रमांक 113 ते 164, 166 ते 197 तसेच 198 ते 207.
मोशी – जुने गट नंबर 450, 442 तसेच 445 ते 449.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.