Pimpri: जनजीवन पूर्वपदावर आले असे समजून कोरोनाला आमंत्रण देवू नका- आयुक्तांचे आवाहन

Don't invite Corona, realizing that public life has come to a standstill - Commissioner's appeal

एमपीसी न्यूज – कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या साथीने हळूहळू जीवनमान पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन शिथिल झाला असला. तरी, कोरोना आपल्यातून गेला नाही. लस, रामबाण उपाय मिळत नाही. तोपर्यंत कोरोना आपल्या सोबत राहणार आहे. हे सदैव लक्षात ठेवावे. याची नोंद ध्यानात न ठेवता जनजीवन पूर्वपदावर आले असे समजून वागल्यास आपण कोरोनाला आमंत्रण देणार आहोत. त्याची काही लक्षणे मागील काही दिवसात शहरात दिसायला लागल्याने भिती व्यक्त करत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या फेसबुक पेजवर ‘व्हिडीओ’ प्रसारित केला आहे. त्यात आयुक्त हर्डीकर म्हणाले, आपण मार्चपासून कोरोना विषाणूशी लढा देत आहोत. पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी या लढ्याला आत्तापर्यंत चांगले सहकार्य केले आहे.

सर्वांच्या सहकार्याने काम चांगले राहिले आहे. देशव्यापी लॉकडाउन शिथिल झाला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील एकल दुकाने सुरु केली. बाजारपेठात पी 1- पी 2 तत्तावर दुकाने सुरु केली.

घरपोच जेवणाची व्यवस्था सुरु केली. उद्योगधद्यांना जीवनदान मिळावे यासाठी सुरक्षित नियमांचे पालन करत 100 टक्के सुरु केले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा दिला आहे. शहरातील कार्यालयेही सुरु झाली आहेत.

शहरात अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे विक्रेते हॉटेलमधून पार्सलची सेवा देत आहेत. नागरिकांनी खाद्य पदार्थ पार्सल घेत असताना त्या व्यक्तीने मास्क लावला आहे का, हातात ग्लोज घातले आहेत का, अन्नाला थेट स्पर्श करत नाही ना आणि डोक्यावर सर्व्हिंग कॅप घातली आहे का,  याची खबरादारी घ्यावी.

त्याशिवाय हॉटेल किंवा रस्त्यावरील कोणत्याही विक्रेत्याकडून तयार खाद्यपदार्थ विकत घेवू नये. त्यातून संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरी, वडापाव खाताना सावधान !

आपल्याला कोरोनापूर्व आयुष्यात पाणीपुरी, वडापाव खाण्याची आवड असते. पण, या कोरोनाच्या काळामध्ये याबाबतीत विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच काही खानपाण विक्री संदर्भात निर्बंध लावले आहेत.

पार्सल, फेरीवाल्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. विक्रेत्यांनी देखील विक्री करत असताना बंधनाचे काटेकोरपणे पालन करावे. उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही स्वत:हून कोरोनाला आमंत्रण द्यायचे नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.