Pimpri : महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या राजवटीत अनागोंदी कारभार सुरु आहे. जे काही कंत्राट निघत आहेत, त्यामध्ये गोलमाल आहे. वाढीव दराची कंत्राटे काढली जात आहेत. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा हल्लाबोल शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (मंगळवारी) केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (मंगळवारी) पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. वायसीएमच्या कारभाराची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले आहे. त्याबाबत विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले, “महिलांवरील अत्याचार दुर्दैवी आहेत. ते रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, भाजपने मागील पाच वर्षातील कार्यकाळाचा लेखाजोखा जरी समोर मांडला. तरीसुद्धा त्यांना कशाबद्दल नक्की आंदोलन करत आहोत हा संभ्रम पडेल”

“पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जे काही कंत्राट निघत आहेत. त्यामध्ये गोलमाल आहे. गेली तीन वर्ष महापालिकेत सत्तेत आल्यानंतर ज्या गोष्टीसाठी भाजप आरडाओरडा करत होते. त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा होत आहेत. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळलेला दिसत आहे. त्याची ओरड होत आहे. इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा भाजपने स्वत:कडे बघून आत्मपरीक्षण करावे” असा सल्लाही डॉ. कोल्हे यांनी दिला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफळला आहे. त्यावर बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, “ठराविक लोकांच्या म्हणण्यानुसार जर गोष्टी होत असतील. तर, त्यामध्ये अस्वस्थता नक्की येते. परंतु, अस्वस्थतेला या पद्धतीने वाट मिळणे दुर्देवी आहे. परंतु, ही वाट का निर्माण झाली झाली. अस्वस्थता, असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांच्या मनात का निर्माण होते. याचा विचार देखील राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन करणे गरजेचे आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.