Pimpri : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘वायसीएम’च्या डॉक्टरांचे टोचले कान (व्हिडिओ)

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली 'वायसीएम'च्या कारभाराची झाडाझडती

रुग्णांची केली विचारपूस, वायसीएमचा आढावा घेतला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयावर वर्षाला सुमारे 450 कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळे रुग्णांना योग्य आणि दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे. रुग्णांची हेळसांड होता कामा नये. उपचाराकरिता लोकप्रतिनिधींच्या फोनची आवश्यकता भासू नये. डॉक्टरांनी आपसातील वाद मिटवून रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘वायसीएम’च्या डॉक्टरांचे चांगलेच कान टोचले. डॉक्टरांच्या भांडणात समन्वयातून मार्ग काढावा. दरम्यान, कोल्हे यांनी प्रत्येक विभागात जाऊन माहिती घेतली. रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. योग्य उपचार मिळतात का ? डॉक्टर वेळेवेर येतात का? याची विचारपूस केली. उपकरणांची झालेली खरेदी, असलेली प्रस्तावित खरेदी आणि त्यानंतर त्याचा होणारा वापर याचा संपूर्ण अहवाल देखील त्यांनी मागविला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (मंगळवारी) पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. वायसीएमच्या कारभाराची माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, दत्ता साने, शाम लांडे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, “वायसीएमच्या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. सादरीकरणामध्ये पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती सांगण्यावर अधिका-यांचा भर होता. परंतु, रुग्णसेवा हे रुग्णालयाचे पहिले कर्तव्य आहे. बाहेरुन येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी. रुग्णालय फ्रेंडली होण्याच्या दृष्टीने ‘रुग्णालय माहिती टेबल’ करण्यात यावा. त्याद्वारे रुग्णाला आयुषमान भारत, महात्मा फुले आरोग्य या शासकीय योजनांची माहिती देण्यात यावी अशी सूचना केली आहे. तक्रारी, नागरिकांच्या समस्यांबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. प्रशासन, डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. दोन महिन्यानंतर पुन्हा याचा आढावा घेणार आहे”

हॉस्पिटल वेटिंलेटरवर आहे असे इतक्या लवकर म्हणता येत नाही. आधी इन्सपेक्शन झाले मग परीक्षा आणि इन्वेस्टीगेशन होईल. मग डिफ्रेसेल डायग्नोसिसवर येऊ. त्यामुळे एवढ्या लवकर निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. परंतु, यावर माझी बारीक नजर असणार आहे. याबाबतीत जे चांगले करता येईल. ते करण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, “वायसीएम रुग्णालयाच्या पलिकडे जाऊन महापालिकेची आरोग्य सेवा आहे. भोसरीतील प्रस्तावित 100 खाटांचे हॉस्पिटल तयार असूनही ते का सुरु होत नाही, त्याचा अहवाल मागविला आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर, जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातील रुग्ण येतात. त्यासाठी केअर सेंटर करावे. रुग्णालयाच्या एकूण कार्यक्षेत्राविषयी बारकाईने लक्ष घातले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपकरण खरेदीच्या माहितीचा अहवाल मागविला

वायसीएममध्ये होत असलेली उपकरण खरेदी आणि त्या उपकरण खरेदीच्या माध्यमातून नक्की ती उपकरणे सद्यस्थितीमध्ये सुरु आहेत का? एकूण उपकरणांची झालेली खरेदी, असलेली प्रस्तावित खरेदी आणि त्यानंतर त्याचा होणारा वापर याचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. काही उपकरणे 2012 मध्ये घेतलेली आहेत. परंतु, अजुनपर्यंत त्याचा वापर झालेला नाही. पुन्हा दोन महिन्यानंतर आढावा घेतला जाईल. त्यानंतर यामध्ये काही सुधारणा केल्या आहेत का, त्याची पाहणी करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like