Pimpri: ‘त्या’ पत्रावरून शिरुरचे खासदार डाॅ. कोल्हे-आढळरावांमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज – शिवनेरीवर शिवसृष्टी, रोप वे, वढू-तुळापूरला शंभुसृष्टी आणि इतर विषयांवरील केंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाच्या पत्रांवरून शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यात जुंपली आहे.

एक वर्षापूर्वीची पत्रे माझ्याकडे असून तशीच पत्रे डॉ. कोल्हे यांनी मिळविल्याची टीका आढळराव यांनी केली होती. तर, हे प्रश्न मांडायला आढळराव यांना 14 वर्षे जावी लागली. मी पहिल्याच वर्षात प्रश्न मांडत असल्याचे प्रत्युत्तर डॉ. कोल्हे यांनी दिले. मी यापूर्वी मांडलेले मुद्दे मांडून डॉ. कोल्हे संसदेचा वेळ घेत आहेत, अशी टिप्पणी माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या कामाचे मूल्यमापन जनतेनेच करावे, असे आढळराव म्हणाले होते.

त्यांच्या टीकेला खासदार डॉ. कोल्हे यांनी आज (शनिवारी) निगडीत पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. माझेच प्रश्न मांडत असल्याचे सांगून आढळराव यांनीच त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. शिवसृष्टी, रोप-वेचे प्रश्न मांडायला त्यांना 14 वर्षे जावी लागली. मी पहिल्याच वर्षी ते मांडले आहेत.

आवश्यकता पडली तर आढळरावांचे मार्गदर्शन घेईनः कोल्हे

माजी खासदार शिवाजीराव आढळराव वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांचा मी नक्कीच आदर करतो. मतदारसंघातील कामे होणे महत्त्वाचे आहे. शिवसृष्टी, रोप-वे होणे महत्त्वाचे आहे. मतदारसंघातील कामांसाठी त्यांचे जे मार्गदर्शन मिळेल, ते मार्गदर्शन मी घेईन. 15 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. आवश्यकता पडली तर नक्की भेटून त्यांचे मार्गदर्शन घेईल, असेही कोल्हे यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.