Pimpri : तळीरामाने धरले हतबल वाहतूक पोलिसांना वेठीस

पोलिसांच्या मदतीला पोलीस आले पाऊण तासानंतर

एमपीसी न्यूज – सात ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना प्रतिसाद मिळेल असा दावा एकीकडे पोलीस आयुक्‍त करीत आहेत. तर दुसरीकडे हतबल वाहतूक पोलिसांना मदतीसाठी तब्बल पाऊस तास वेटिंग करावे लागले. शुक्रवारी सायंकाळी पिंपरी पोलीस ठाण्यासमोर एका तळीरामाने थेट वाहतूक पोलिसांनाच आव्हान देत वेठीस धरले. पोलिसांनाच पोलीस मदत मिळविण्यासाठी पाऊण तासांचा वेळ लागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केला.

सुदर्शन कारंडे (रा. जाधववाडी, चिखली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तळीरामाचे नाव आहे.

शुक्रवारी सायंकाळी सुदर्शन याने पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी पोलीस ठाण्यासमोर नो-पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली. त्याच्या दुचाकीला पोलिसांनी जॅमर लावला. सुरवातीला तो दंड भरण्यास तयार नव्हता. मात्र नंतर तो रोख स्वरूपात पैसे भरण्याचा आग्रह करू लागला. चिंचवड वाहतूक शाखेचे निरीक्षक संजीवकुमार पाटील यांना अरेरावीची भाषा करू लागला. त्याची अरेरावी वाढत गेल्याने वाहतूक पोलिसांनी पिंपरी पोलिसांची मदत मागितली. मात्र तब्बल पाऊण तासांनंतर पोलिसांची मदत आली. तोपर्यंत त्या तळीरामाने वाहतूक पोलिसांना वेठीस धरले होते.

कारंडे हा महापौरांच्या कार्यालयाशेजारी राहत असल्याने त्याने थेट महापौर राहुल जाधव यांना फोन केला. मात्र तू दारू प्यायला असल्याने मी पोलिसांशी बोलणार नाही, असे महापौरांनी त्याला सांगितले. त्यानंतरही तो पोलिसांशी बोलण्याचा आग्रह धरीत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.