Pimpri : भक्ती करताना योग्य मार्गाने करावी – जगदगुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य माणूस सगुण रूपात परमेश्‍वर पाहून त्याची सगुण भक्ती करतो. निर्गुण भक्ती करण्यासाठी मोठी साधना करावी लागते. ती सर्वसामान्यांना शक्य होत नाही. म्हणूनच भक्ती करताना योग्य मार्गाने करावी, असे मत करवीरपीठाचे जगदगुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांनी नवी सांगवी येथे व्यक्त केले.

नवी सांगवी येथे श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्यावतीने महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहण, प्राणप्रतिष्ठानिमित्त ते बोलत होते. यावेळी कलशारोहण करवीर पीठाचे श्री जगदगुरु विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, उद्योजक विजय जगताप, नगरसेवक नामदेव ढाके, शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौगुले, माधवी राजापुरे, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मंगलमय अशा वातावरणात महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण समारंभ पार पडला.

  • ते पुढे म्हणाले की, आधुनिक विज्ञान युगातही माणूस अधिक धार्मिक होताना दिसतो. या युगात माणूस श्रद्धावान बनत आहे. मात्र, अनेकदा तो परिस्थितीने विवश होतो. परिस्थिती काही वेळेस माणसाला चमत्कार आणि बुवाबाजीकडे नेण्यास भाग पाडते, माणूस अधिक श्रद्धावान असणे व धार्मिक प्रवृत्तीचा होणे यामध्ये गैर नाही. कारण त्याची धर्मभावना त्याला ईश्‍वराच्या जवळ ठेवते. माणूस नुसता श्रद्धावान किंवा धार्मिक होऊनही चालणार नाही. ती भक्ती डोळस असली पाहिजे. मंदिराची रचना, कळस, खांब आणि पाया यांचा मानवी शरीराशी कसा संबंध आहे, याचेही निरूपण त्यांनी केले. कळस म्हणजे बिंदुरूपातील परमेश्‍वरी शक्ती असते. ती सूक्ष्म रूपाने पायापर्यंत येत असते. निर्गुण भक्ती करणार्‍या संन्याशांनीच मंदिराच्या कलशारोहण का करावे, हेही त्यांनी अत्यंत रसाळ वाणीने पटवून दिले.

पूर्वी वैराग्य हा मोक्षाचा मार्ग होता. आजच्या युगात ते शक्य नाही. पण, परमेश्‍वराच्या भक्तीने मोक्ष साधता येऊ शकतो. सकाळची वेळ ही देवदर्शन, चिंतन आणि चांगल्या कामासाठी उपयुक्त असते. सुविचारांचे पालन, योग्य वर्तनही आवश्यक आहे. पृथ्वीवर सर्वच प्राणी धर्म पाळतात; मात्र मनुष्यप्राणी अधर्माचरण करत आहे. यामुळेच आज अतिवृष्टी, अनावृष्टी, तसेच आपत्कालीन परिस्थिती ओढवली आहे. जो अधर्माने वागतो, तेथे भीती आहे. सृष्टी आपले कार्य करते. मानवाने सत्कार्य केल्यास त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. मानवाने संतांच्या मार्गदर्शनातून धर्म समजून घ्यायला हवा.

  • प्रत्येक कर्माला शास्त्रीय आधार असतो. मनुष्याचा जन्म एकदाच येत असतो. या जन्माचे सार्थक करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने सत्कार्य करावे. अनुष्ठान सोहळ्यामुळे परीसरात धार्मिक, अध्यात्मिक वातावरण तयार होते. त्याचा परिणाम मानवतेची भावना वाढण्यात होतो. निसर्गाचा र्हास कमी होण्यास मदत होते. कार्यक्रमाचे संयोजन श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.