Pimpri : दुर्गेश्वर मित्र मंडळ, श्रीनिवास विहार मित्र मंडळाने पूरग्रस्तांना दिले संसारोपयोगी साहित्य

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळाने पुराने बाधित झालेल्या सांगलीतील, मिरज तालुक्यातील हरिपूर गावातील 150 कुटुंबियांना रविवारी (दि. 25) संसारउपयोगी साहित्य दिले. त्यामध्ये तवा, पातेली, पोळपाट, लाटणे, ताट, वाटी, ग्लास, परात असे साहित्य दिले. शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या पुढाकारातून राबविलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून साहित्याचे वाटप करण्यात आले.

अमित गावडे म्हणाले, “कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले आहे. भीषण परिस्थितीनंतर नागरिकांना सावरण्यासाठी राज्यभरातून मदत केली जात आहे. पूरपरिस्थीतीमुळे निगडी, प्राधिकरणातील दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवावर होणारा अधिकचा खर्च टाळला जाणार आहे.

त्यातील पैशातून पूरग्रस्तांसाठी संसारोपयोगी साहित्याचे सेट खरेदी केले. तसेच पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी पूरग्रस्तांना देण्यासाठी संसारोपयोगी साहित्याचे सेट मंडळाकडे दिले होते.

दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळाने खरेदी केलेले आणि नागरिकांनी दिलेले संसारोपयोगी साहित्य घेऊन नगरसेवक अमित गावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी रविवारी सांगलीतील, मिरज तालुक्यातील हरिपूर गावात गेले. महापुराने नुकसान झालेल्या 150 कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी कैलास जायगुडे, सचिन नागपुरे, प्रकाश कदम, अविनाश जमदाडे, अतुल धुमाळ, सिद्धांत देशमुख, प्रसाद यादव, करण कोठावळे आदी उपस्थित होते.

महापुराच्या भीषण परिस्थितीनंतर नागरिकांना सावरण्यासाठी मदत केल्याने हरिपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.