Pimpri: कॅम्पातील अतिक्रमण कारवाई दरम्यान व्यापा-यांचा गोंधळ; कारवाई अर्थवट 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रण विभागातर्फे पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणावर कारवाई सुरु असताना व्यापरांनी कारवाईला विरोध दर्शवत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण तणावपुर्ण होऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण कारवाई स्थगित करण्यात आली.

शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या पिंपरी कॅम्प, शगुन चौकात अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पदपथ, रस्ते अतिक्रमणांनी गिळंकृत  केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रण विभागाने दोन दिवसांपासून कॅम्पातील अतिक्रमणावर धडक कारवाई सुरु केली आहे. आज शगुन चौकापासुन कारवाईला सुरुवात केली होती. सात दुकानांवर कारवाई केल्यानंतर जेसीबी नादुरुस्त झाला. त्यावेळी व्यापा-यांनी गोंधळ घालन्यास सुरुवात केली. महापालिकेच्या वतीने ‘हॉकर्स झोन’चे नियोजन केले जात नसून केवळ पथारी वाल्यांवर कारवाई केली जात असल्याचाही आरोप येथील व्यापा-यांनी केला.

व्यापा-यांनी गोंधळ घातल्याने तणावपुर्ण परस्थिती निर्माण झाली होती. तणाव वाढत चालल्याने पोलिसांबरोबरच स्थानिक नगरसेवकांनीही याठिकाणी धाव घेतली. मात्र, व्यापारी माघार घेण्यात तयार नव्हते. त्यामुळे मोजणी आणि आखणी करुन अतिक्रमण निर्मूलन पथकाने माघार घेतली.

याबाबत बोलताना प्रवक्ते विजय भोजणे म्हणाले,’अतिक्रमणाची कारवाई होती.अतिक्रमणाला पूर्व नोटीस देण्याची कोणतीही आवश्यकता नाही.वाहतुकीला अडथळा ठरणा-या अतिक्रमणावर पालिका नोटस न देता कारवाई करु शकते’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.