Pimpri: वर्षभरात उद्यान विभागाने 54 हजार रोपे जगविली; तर, पाच हजार रोपे दगावली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वर्षभरात शहराच्या विविध भागांमध्ये एकूण 69 हजार 455 रोपे लावली होती. त्यापैकी विविध कारणांमुळे 5 हजार 803 रोपे दगावली आहेत. तर, उर्वरित 54 हजार 551 रोपे जीवंत असल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षाप्राधिकरण समितीचे सन 2018-19 चे सुधारित आणि सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक असे एकूण 28 कोटी, 67 लाख 16 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने आज मान्यता दिली. शहरातील वृक्षारोपणाबाबतची माहिती सभागृहाला सादर केल्याशिवाय या अंदाजपत्रकाला मान्यता न देण्याची भूमिका स्थायी समिती सदस्यांनी घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाने ही आकडेवारी सादर केल्यानंतर या विषयाला मंजुरी दिली.

महापालिकेच्या एकूण आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वृक्ष प्राधिकरण उद्यान विभाग, दुर्गादेवी टेकडी, मेट्रोमार्फत केलेले वृक्षारोपण, रोपवाटिकेतून विररित केलेली रोपे, हौसिंग सोसायट्या आणि लष्करी हद्दतील वृक्षारोपणाचा समावेश आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला वर्षभरात एकूण 60 हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र, या विभागाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये एकून 69 हजार 455 रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी विविध कारणांमुळे 5 हजार 803 रोपे दगावली आहेत.

शस्त्र सरावामुळे रोपे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक
वृक्षारोपणासाठी शहरात असलेल्या लष्कराच्या विविध ठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये वर्षभरात एकूण 35 हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी 30 हजार 753 रोपे जगली. तर, 4 हजार 247 रोपे दगावली. लष्करी हद्दीत चालणा-या शस्त्र सरावामुळे या भागात रोपे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष या अहवालात नमूद केला आहे. रोपे जगण्याचे हे प्रमाण सरासरी 87.86 टक्के एवढी आहे.

रोपे दगावण्याची कारणे!
वृक्षारोपणानंतर त्यांना वेळेवर पाणी देण्याची जाबबादारी उद्यान विभागाची असली, तरीदेखील काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे रोपे दगावली आहेत. त्यामध्ये स्थापत्य विभागाच्या वतीने केले जाणारे रस्तारुंदीकरण, पादचारी मार्ग, ड्रेनेज लाईनच्या कामातील रोपे, वाहने पार्क करताना, पाण्याअभावी या मानव निर्मित संकटांबरोबरच आग, नदीला आलेला पूर आणि मोकाट जनावरांच्या वावरामुळे ही रोपे दगावल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.