Pimpri: मोशीतील पाच युवकांसह आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 152 वर

60 जण कोरोनामुक्त, सहा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी संजय गांधीनगर परिसरातील पाच युवकांसह पिंपळेगुरव, चिंचवड येथील आठ जणांचे आज (बुधवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचाही समावेश आहे. पाच युवक, एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.  यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 71 वर पोहचला आहे. तर, शहरातील 142 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 152 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 60 जण कोरोनामुक्त झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने मंगळवारी (दि. 5) 204 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आले आहेत. मोशी संजय गांधीनगर, पिंपळेगुरव आणि चिंचवड परिसरातील सात आणि पुण्यातील एक अशा आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामध्ये 21, 23, 24, 25, 28 वर्षीय युवक आणि एका 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, 25 वर्षीय आणि महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय अशा दोन महिलांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील सात जणांवर भोसरीतील रुग्णालयात तर एकावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 152  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 60 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महापालिका रुग्णालयात कोरोना बाधित सक्रिय 71 रुग्णांवर आणि शहरातील दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा आणि 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा सहा जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.