Pimpri: जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आठ पथके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील हातगाड्यांवर आज (शुक्रवारी) धडक कारवाई केली. तसेच दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करु नये असे आवाहन केले जाते. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने आठ पथकांची निर्मिती केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिका-यांनी कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केलेली आहे. खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे समारंभ सांस्कृतिक, धार्मिक सण, उत्सव, जत्रा, मनोरंजन, कार्यक्रम, क्रीडा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलन, सहली, शॉपिंग, कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमा ग्रह, शाळा-महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, पानटपरी, सर्व परमिट रूम, बियर बार, तसेच अत्यावश्यक विषयाखेरीज इतर शासकीय बैठकांस 31 मार्च पर्यंत मनाई आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण निर्मूलन व नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासमवेत आठ पथक निर्माण केली आहेत. या पथकामांर्फत बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड सहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 याद्वारे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल याच्या सूचना देण्यात येत आहेत.

या आठ पथकात अतिक्रमण विभागाचे प्रत्येकी एक अधिकारी, एक वाहन चालक, तीन पोलीस कर्मचारी, तीन होमगार्ड, आठ मजूर तसेच पोलीस विभागाकडील एक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असणार आहे.

या पथकामार्फत पिंपळेगुरव, सांगवी येथील कृष्णा चौक, सृष्टी चौक, फेमस चौक, पिंपळे सौदागर, वाकड, भोसरी, चिखली, मोशी, बोराडेवाडी, इंद्रायणी नगर, आकुर्डी, निगडी, दिघी, दापोडी, साने चौक, यमुनानगर आदी परिसरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.