Pimpri : शास्तीकराचे पाप आम्ही धुतोय – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर माफ करण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक आहे. युती सरकारने 600 स्केवअर फुटपर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यापुढील मालमत्तांचा देखील शास्तीकर माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे  सांगत  शास्तीकराचे विरोधकांचे पाप आम्ही धुवून काढत आहोत अशी टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  (दि. 9 जानेवारी) रोजी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर विरोधकांनी शनिवार (दि.12)पासून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे ‘काऊंट डाऊन’ सुरु केले आहे. विरोधकांच्या या काऊंट डाऊन’ आंदोलानाला सभागृह नेते पवार यांनी आज (सोमवारी) प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शास्तीकर माफीची घोषणा करण्याअगोदर विरोधक काय झोपले होते का?, मुख्यमत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्यांना शास्तीकराची आठवण झाली का? असा सवाल उपस्थित करत  पवार म्हणाले, शास्तीकर माफ करुन शहरवासियांना दिलासा देण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. युती सरकारने 600 स्केवअर फुटपर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यापुढील मालमत्तांचा देखील शास्तीकर माफ करण्याबाबत देखील सरकार सकारात्मक असून जनतेच्या हिताचा निर्णय घेईल.

शास्तीकर हा विरोधकांमुळेच लागला आहे. ते पाप धुण्याचे काम आम्हाला करावा लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर शास्तीकर माफी करण्याचे आश्नासन दिले होते. त्यावेळी विरोधकांनी काऊंट डाऊन का केले नाही?. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराचा प्रश्न सोडविण्याची घोषणा केली असताना विरोधक काऊंटन करत आहेत. शास्तीकराचा विषय सरकारच्या अजेंड्यावर असून विरोधकांनी काऊंट डाऊनचे काम करावे, आम्ही प्रश्न सोडविण्याचे काम करतो, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.