Pimpri : आचारसंहिता लागू ! ; महापौरांनी सरकारी गाडी जमा केली अन्‌ रिक्षाने घरी गेले

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा करण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होताच शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी सरकारी वाहन जमा केले अन्‌ स्वत: रिक्षा चालवत घरी रवाना झाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (शनिवारी) दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या वापरात शासकीय वाहने आहेत. या पदाधिका-यांना शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले. त्यानंतर रिक्षातून महापौर जाधव घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान सव्वा महिने पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरावर निर्बंध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.