Pimpri : उमेदवारांना तीनवेळा द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा हिशोब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडणुकीचा खर्चाचा तीन वेळा हिशोब द्यावा लागणार आहे. उमेदवारांना खर्चाची माहिती टिपण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदवह्याची शुक्रवारपर्यंत (दि. 11) तपासणी उशीरापर्यंत सुरु होती. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला याची माहिती समजणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची प्रचाराला जोर चढला आहे. प्रचारासाठी केवळ सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक विभागानेही उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लावणे सुरु केले आहे. तीन टप्प्यात उमेदवारांना प्रचाराच्या खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे. पहिला टप्पा गुरुवारी (दि.10) होता. हिशोबाच्या टिपण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदवह्याची 11 ऑक्‍टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला याची माहिती समजणार आहे.

निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची टिपणे करण्यासाठी दिलेल्या नोंदवहीची तपासणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरु करण्यात आली. उमेदवारांनी नोंदवहीमध्ये लावलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलेल्या खर्चाचा ताळमेळ लावण्यात येत असून यामध्ये तफावत असल्यास ती उमेदवारांच्या प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील खर्चाची तपासणी झाल्यानंतर पुढील टप्प्यातील खर्चाची तपासणी 15 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील खर्चाची तपासणी 19 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.