Pimpri : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची 16 फेब्रुवारीला निवडणूक

आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, 18 जानेवारीपर्यंत भरता येणार अर्ज

एमपीसी न्यूज – कासारसाई दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 2019-20 ते 2024-25 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 18 जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी 21 संचालकांच्या जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. आर. एस. धोंडकर यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

आजपासून म्हणजेच 14 ते 18 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी तीनवाजे पर्यंत निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची प्रसिद्धी याचदरम्यान केली जाणार आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पौंड शाखेतील सभागृहात अर्जांची छाननी केली जाणार आहे. 21 जानेवारी रोजी पात्र अर्ज प्रसिद्ध केले जाणार आहेत. 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 5 फेब्रुवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर 21 संचालकांची निवड केली जाणार आहे. हिंजवडी-ताथवडे गट एकमधील सभासदांनी तीन प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. पौंड-पिरंगुट गट दोनमधून तीन, तळेगाव-वडगांव गट तीनमधून तीन, सोमाटणे-पवनानगर गट चारमधून तीन, खेड-शिरुर हवेली गट पाचमधून चार प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. तर, महिला राखीव प्रतिनिधी दोन, अनुसुचित जाती जमाती एक, इतर मागासवर्गीय एक, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील एक असे 21 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. उमेदवारी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. अनुसुचित जाती, जमाती राखीव मतदारसंघ वगळून इतर मतदारसंघासाठी एक हजार रुपये, अनुसुचित जाती जमातीसाठी 300 रुपये निवडणूक अनामत ठेव राहणार आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांना मोठे महत्व असते. सहकारी निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.