Pimpri : ‘इलेक्शन फंड’ गोळा करण्यासाठीच सत्ताधा-यांचा बैठकांवर जोर – दत्ता साने 

स्वच्छतेच्या नावाखाली सत्ताधा-यांचे केवळ 'फोटोसेशन'

एमपीसी न्यूज – लोकसभा व विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने ‘इलेक्शन फंड’  गोळा करण्यासाठी सत्ताधारी अधिकार्‍यांसोबत बैठका घेत आहेत. त्यांचा भर विशेष करून पाण्यावर अधिक आहे. त्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरून, दबाव वाढवून निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. तसेच स्वच्छतेच्या नावाखाली सत्ताधा-यांनी केवळ ‘फोटोसेशन’ केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पिंपरी चौकातील ‘स्वच्छच रस्ते स्वच्छ’ करीत फोटोसेशन करून आपली प्रसिद्धीची भूक भागवून घेतली. तेथे दोन टन कचरा कोठून जमा झाला हे समजत नाही. त्यांनी खरोखरच स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी झोपडपट्टीत अभियान घेणे गरजेचे होते. तसेच पालिकेच्या एक अधिका-याचा डेंगूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे  आता तरी पालिका प्रशासनाने जागे व्हावे, असे सल्लाही त्यांनी दिला.

तत्कालीन स्थायी समितीने अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून शहराचे 2 भाग करून कचरा संकलनाचे काम वाढीव दराने मंजुर केले होते. आम्ही विरोध केल्याने 1 हजार 900 प्रती टनाचे दर 230 रूपयांनी कमी झाला. आता त्याच दोन ठेकेदारांना 4 भागांनुसार काम देण्याचा घाट घातला जात आहे. ते ठेकेदार आखणी दर कमी करण्यास तयार आहेत. त्यावरून या कामात भ्रष्टाचार झाला हे सिद्ध होते, असेही साने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.