Pimpri : पाणी, वने, शाश्वत विकास या संकल्पना घेऊन पर्यावरण संमेलने व्हायला हवीत – रवींद्र धारिया

एमपीसी न्यूज- सर्वांनी मिळून कामे केली, तरच आपण पर्यावरण राखू शकतो. यापुढे पाणी, वने, शाश्वत विकास या संकल्पना घेऊन पर्यावरण संमेलने व्हायला हवीत. लोकांच्या प्रयत्नातून नवीन दिशा देण्याचे काम पर्यावरण साहित्य संमेलनाने केले असे प्रतिपादन वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित पर्यावरण साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात गुरुवारी (दि.20) केले.

“वनराईचे कार्य शाश्वत विकासावर आधारलेले आहे, हा शाश्वत विकासच लोकांचे शिक्षण, आरोग्य, उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचा शहराकडे येणारे लोकांचे लोंढे रोखण्यासाठी पूरक ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पर्यावरण संमेलनाची आवश्यकता होती. या संमेलनाच्या माध्यमातून ही पूर्तता झाली” असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी देवराई विषयावर बोलताना डॉ. उमेश मुंडल्ये म्हणाले, “आज विकासाच्या नावाखाली जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचे समाजावर भयंकर परिणाम होत आहेत. तसेच यामुळे जागतिक तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. वृक्षलागवड ही केवळ इव्हेंटपुरती केली जात आहे. राज्यात आजघडीला पावणेचार हजार देवराई आहेत. मात्र, त्या टिकल्या पाहिजेत. देवराईमध्ये पावसाचे पाणी जिरवण्याची क्षमता जास्त असते. उन्हाळ्यातही केवळ देवराईमधील पाणीसाठ्यामुळे तिथले जनजीवन सुरळीत सुरू आहे”त्यामुळे आहेत त्या देवराई टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्थानिकांची असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. अभय कुलकर्णी यांनी ई- कचरा याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज, ई-कचरा, वृक्षसंवर्धन, प्रदूषण, गडसंवर्धन आदी विषयावर दहा शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली. संमेलनाच्या विशेषाध्यक्ष पदी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, संमेलनाचे अध्यक्ष (तांत्रिक) सुदर्शन तांदळे, स्वागताध्यक्ष डॉ. अभय कुलकर्णी, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, आयोजक विकास पाटील, वनराई मासिकाचे संपादक अमित वाडेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.