Pimpri: पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील यांचे कोरोनामुळे निधन

Pimpri: Environmental expert Vikas Patil dies due to corona प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण, पवना नदी सुधार, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय 63) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण, पवना नदी सुधार, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत लॅपटॉप वाटप देखील केले होते.

पालिकेच्या निवडणुका, राष्ट्रीय कार्यक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वृक्षसंवर्धन यासारख्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांनी पत्रकारितेची पदवी देखील घेतली होती.

विकास पाटील यांना 10 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आयसीयू बेडची आवश्यकता असल्याने तीन दिवसांपूर्वी डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.