Pimpri: राज्यातील सत्ता समीकरणे; महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र!

एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे ‘महाविकासआघाडी’चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित होताच पिंपरी महापालिकेत महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी मतदान केले. तर, तीन नगरसेवक गैरहजर होते.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी आज (शुक्रवारी) निवडणूक झाली. भाजपच्या माई ढोरे महापौरपदी निवडून आल्या. त्यांना भाजपचे 77 आणि अपक्ष चार अशी 81 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीच्या माई काटे यांना पक्षाची 35 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे गैरहज होते. तसेच शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक सचिन भोसले, अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे यांनी देखील राष्ट्रवादीच्या माई काटे यांना मतदान केले. त्यामुळे काटे यांना 41 मते मिळाली.

शिवसेनेचे प्रमोद कुटे, निलेश बारणे, अश्विनी चिंचवडे, मनसेचे सचिन चिखले आणि अपक्ष नवनाथ जगताप गैरहजर राहिले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याने राज्याबरोबरच आता महापालिकेत देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.