Pimpri: ‘ईएसआय’ योजनेंतर्गत विमाधारक कामगार, कर्मचाऱ्यांना बेरोजगारी भत्ता द्या- संदीप बेलसरे

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आस्थापना गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्योजक आर्थिक संकटात सापडले असून कामगारांचे वेतन देणे अशक्य झाले आहे. कामगार, कर्मचारी बेरोजगार होऊ नयेत यासाठी ‘ईएसआय’ योजनेंतर्गत विमाधारक कामगार, कर्मचाऱ्यांना बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांना पत्र मेल केले आहे. त्यात बेलसरे यांनी म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आस्थापना  बंद आहेत. उद्योजक अगोदरच गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्मचार्‍यांना, कामगारांना वेतन देण्याची आर्थिक स्थिती नाही. परंतु, कामगार बेरोजगार होऊ नयेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. सरकार किंवा सरकारी एजन्सीच मालकांना कामगारांना  आणि कर्मचार्‍यांना दिलासा देऊ शकतील.

ईएसआय कॉर्पोरेशन ज्या कामगारांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उदात्त हेतूने स्थापन केली गेली आहे. ज्याने त्यांच्या फंडामध्ये योगदान देत असलेल्या विमाधारकास मदत केली पाहिजे. ईएसआय कायद्याच्या कलम 19 मध्ये ईएसआय कॉर्पोरेशनला विमधारक  व्यक्तींचे आरोग्य आणि राहणीमान  सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सशक्त केले आहे. या तरतुदीच्या अनुषंगाने 2016 साली झालेल्या 175 व्या बैठकीत ईएसआयसीने विमा उतरलेल्या व्यक्तींना बेरोजगारी भत्ता देण्यासाठी ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ योजना या नावाची योजना तयार केली होती.

या योजनेनुसार किमान दोन वर्षे वैध ईएसआय कव्हरेज असलेल्या विमाधारकांना त्यांच्या रोजच्या रोजंदाराच्या 90 दिवस 25 टक्यांपर्यंत बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे. पुरेशी प्रसिद्धी न मिळाल्याने ही योजना अतिशय आकर्षक असूनही अद्यापपर्यंत कोणीही या योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेतला नाही. ताज्या वार्षिक आकडेवारीनुसार ईएसआयसीकडे 91,000 कोटी एवढी मोठी रक्कम जमा आहे. ही योजना 30 जूनला कालबाह्य होईल. त्यामुळे लघुउद्योजकांची खराब आर्थिक लक्षात घेता. कामगार, कर्मचा-यांना बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी विनंती बेलसरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.