Pimpri : वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचे काम सर्वांनी करावे – महेश लांडगे

डुडूळगावात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाच्या वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते डुडूळगाव येथील फॉरिस्ट वन गट 190 मधील पाच हेक्टरमध्ये एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये पिंपळ, वड, चिंच, करंज, आवळा या झाडांचा समावेश आहे. दरम्यान, वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

डुडूळगाव येथे आज (गुरुवारी) झालेल्या या कार्यक्रमाला वन विभागाचे सहाय्यक संरक्षक संजय मारणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.जे. सणस, वन परिमंडळ अधिकारी शीतल फुंदे, क्षेत्र अधिकारी दया डोमे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी उपस्थित होते.

  • आमदार महेश लांडगे म्हणाले, ”राज्य सरकारचा यंदा 33 कोटी नवीन वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन, शुद्ध हवा देतात. पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आता नागरिकांना पटू लागले आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे प्रत्येकाने झाड लावले पाहिजे”.

”अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होतात. त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नाही. त्यामुळे लावलेले झाड जगविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे संगोपण केले पाहिजे. एक झाड कमी लावले. तरी, चालेल पण लावलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.