Pimpri : देश अपघातमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत -अमर साबळे

एमपीसी न्यूज – देश अपघातमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. अपघात कमी करण्यासाठी अनेक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने तयार व्हावेत. यासाठी अनेक सामाजिक, वैद्यकीय संस्थांनी पुढे यावे, असे मत राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.

लोकमान्य रुग्णालय, आरटीओ आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान खासदार अमर साबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सन्मान सोहळ्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, भालचंद्र कुलकर्णी, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. रोहन काटे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. जयंत श्रीखंडे आदी उपस्थित होते.

पोलीस कर्मचारी नागेंद्र बनसोडे, सचिन बेदले, एच सी ढाकणे, वाहतूक पोलीस कर्मचारी दत्तात्रय राऊत, अनिल जगताप, संतोष ठकर, रिक्षा चालक हरिभाऊ शिंदे, बाबूभाई शेख, सुरेश आठवले, आनंद सदावर्ते, अनिल घोडके आदींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. रिक्षाचे रूपांतर रुग्णवाहिकेत झाल्यास आवश्यक तेवढ्या रिक्षा चालकांना लोकमान्य रुग्णालयाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खासदार अमर साबळे म्हणाले, “अपघाती मृत्यू टाळण्यासाठी काम करायला हवं. नियमांची सक्ती असो अथवा नसो, आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने सुरक्षा नियम पाळायला हवेत. खाकी वर्दीमध्ये असलेला व्यक्ती देखील माणूस आहे. त्यांनाही संवेदना आहेत. याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला आला आहे. अनेक पोलीस आणि रिक्षा चालकांनी अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांचे समाजातील आतित्व महत्वाचे आहे. त्यांच्या काही वेळच्या अनुपस्थितीने सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. विचार बदलल्यास समाज परिवर्तन होईल.”

बाबा कांबळे म्हणाले, “रिक्षा चालकांना रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी करून घेण्यासाठी रिक्षाचे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करता येईल का, असा उपक्रम राबवता येईल का? याबाबत परिवहन विभाग आणि अन्य विभागाशी समन्वय साधला जात आहे. या वर्षी हा उपक्रम देशात प्रथमच सुरू होईल अशी आशा आहे. उद्धट वागणारे, भाडे नाकारणारे रिक्षाचालक काहीजण आहेत. पण त्या पलीकडे देखील रिक्षाचालक आहेत. अपघाताच्या ठिकाणी प्रथम नागरिक रिक्षाला शोधतात. रिक्षा चालक देखील अपघातग्रस्तांना मदत करण्यात अग्रेसर आहेत.”

आनंद पाटील म्हणाले, “प्रत्येक दहावा मृत्यू अपघातामुळे होतो. रस्त्यांवर नागरिक सुरक्षित नाहीत. दुसऱ्या महायुद्धात सहा वर्षात सव्वालाख लोकांचा मृत्यू झाला. भारतात एका वर्षात केवळ रस्त्यावरील अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. एवढे हे भीषण प्रमाण आहे. अपघात जाणीवपूर्वक होत नाहीत. पण त्याचे भयानक रूप बघता ते टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. अपघाताच्या ठिकाणी जखमी व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत करण्याबाबत साक्षरता वाढवायला हवी. अपघातानंतरचा ‘गोल्डन हावर’ प्रत्येकासाठी महत्वाचा आहे.

अपघातानंतर जो तात्काळ मदत करतो, तो खरा देवदूत. अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबत बोलले जाते पण प्रत्यक्ष मदत करण्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रिक्षा चालक सक्रिय सहभाग घेतात. वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणे गरजेचे आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरायला हवे. हॉर्न केवळ गरजेच्या वेळीच वाजवा. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा. वाहतूक सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्यांचे वाहन चालवण्याचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जात आहे, असेही पाटील म्हणाले.

राजेंद्र निकाळजे म्हणाले, “सध्या रस्त्यांवर अघोषित युद्ध सुरू आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांची संख्या घटत आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी शासनाला कायदे करून दंड आकारावे लागत आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. अपघाताला चालना देणे, वाहतुकीचे नियम न पाळणे हे जागृत समाजाचे लक्षण नाही. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ही जनजागृती एक आठवडा कार्यक्रम घेऊन होणार नाही. तर प्रत्येकाने प्रत्येक दिवशी याबाबत जनजागृती करावी.”

डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभय कुलकर्णी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.